लोकसभेची रणधुमाळी : शरद पवारांच्या उमेदवारीमुळे भाजपा हतबल 

माढा : पोलीसनामा ऑनलाईन  – शरद पवार यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलाच धक्का बसला आहे. तर भाजपला माढ्यात उमेदवार शोधण्यावरून हतबलतेचा सामना करावा लागत आहे. सुभाष देशमुख यांना पक्ष उमेदवार करणार का? या प्रश्नाचे उत्तर अद्याप तरी स्पष्ट झाले नाही. मात्र शरद पवार यांच्या विरोधात तगडा उमेदवार मिळाला नाही तर सुभाष देशमुख यांनाच पक्षादेश शिरसावंद्य मानून शरद पवारांना सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा – ‘उद्धव ठाकरे सरड्यांचा पक्षप्रमुख नक्की होऊ शकतो’ 

म्हणून मोहिते-पाटील यांची उमेदवारी वरून माघार

विजयसिंह मोहिते पाटील आणि बारामतीचे पवार यांच्यात मागील १० वर्षांपासून संबंध चांगले राहिले नाहीत. त्यामुळे शरद पवार यांच्या उमेदवारीला विजयसिंह यांचा मनापसून पाठींबा असेलच असे माही. मात्र सुमित्रा पतसंस्थेचा गैरव्यवहार मोहिते पाटील कुटुंबाला चांगलाच अडचणीत घेऊन गेला आहे. त्याच प्रमाणे भाजप सरकारने त्यांच्या मागे कार्यवाहीचा तगादा लावला आहे. अशात शरद पवार माढा मागत असतील तर त्यांचा रोष कोणी ओढवून घ्यावा असे म्हणत विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या उमेदवारीचे समर्थक बनले आहेत.

शरद पवारांच्या विरोधात उभा राहणारे  सुभाष देशमुख नेमके कोण आहेत

सध्या राज्याचे सहकार मंत्री पद भूषविणारे सुभाष देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दोन पिढ्याचे पाईक आहेत. त्यांचे वडील संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. त्यानंतर त्यांनी हि संघाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. बांधकाम व्यासायिक ते भाजपचा नेता अशी त्यांची कारकिर्द राहिली आहे. आपल्या राजकारणाची सुरुवात विधानपरिषदेच्या निवडणुकीने करणारे सुभाष देशमुख २००४ साली सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नीचा पराभव करून लोकसभेत गेले. त्यानंतर २००९ साली त्यांनी माढ्यातून शरद पवार यांच्या विरोधात लोकसभा लढवली. त्यात त्यांनी २ लाखाहून अधिक मते घेतली. मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी तुळजापूरातून विधानसभेची निवडणूक लढवली मात्र तेथे हि काँग्रेसच्या मधुकर चव्हाण यांनी सुभाष देशमुख यांना पराभूत केले. २०१४ साली सुभाष देखमुखांनी विधानसभा लढवून विजय मिळवला आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री पद हि कमावले.

शरद पवार यांना टक्कर देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या सारखा तगडा उमेदवार दुसरा शोधून सापडणार नाही. म्हणून भाजप त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच भाजपला शरद पवारांच्या विरोधात तगडा उमेदवार मिळाला नाही तर सुभाष देशमुखच भाजपचे उमेदवार म्हणून समोर येतील हि शक्यता नाकारता येणार नाही.