तरण्याचं झालाय कोळसं अन म्हाताऱ्याला आलंय बाळसं …वृद्ध विशीतील विवाहितेला घेऊन फरार… 

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते असे म्हणतात याच म्हणीची प्रचिती बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील  एका गावातली ग्रामस्थ घेत आहेत. त्याचं  झाल असं की या गावात राहणाऱ्या ६० वर्षीय वृद्धाचा आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या २० वर्षीय विवाहितेचं सूत जुळलं आणि सारा संसार सोडून हे जोडपे फरार झाले. आता गावात फक्त या प्रकरणाचीच चर्चा आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी-नगर हे हद्दीवर गावअसून, संबंधित गावातील एका तरुणाचा वर्षभरापूर्वी नगर तालुक्‍यातील एका अठरावर्षीय मुलीशी विवाह झाला. हा तरुण पुणे येथे नोकरीस असून, सासूसमवेत ही विवाहिता गावात राहते. यादरम्यान घराशेजारीच राहणाऱ्या साठवर्षीय वृद्धाशी तिचे सूत जुळले.
आम्ही एकमेकांवर प्रेम केलय … आता संसार थाटणार आहोत 
पंधरा दिवसांपूर्वी विवाहिता पतीकडे पुणे येथे गेल्यानंतर तेथूनच हे जोडपे गायब झाले. या प्रकरणाची नोंद अंभोरा व पुणे पोलिसांत करण्यात आली होती. दरम्यान, नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर पंधरा दिवस अज्ञात स्थळी राहून हे जोडपे तीन-चार दिवसांपूर्वी पोलिसांसमोर हजर झाले. त्यांनी पुणे व अंभोरा पोलिसांसमोर ‘आम्ही एकमेकांवर प्रेम करीत असून, दोघांच्या संमतीने संसार थाटणार आहोत’ असे लेखी दिले. त्यानंतर हे जोडपे पुन्हा बाहेरगावी निघून गेले.
नातवंडाआधीच आजोबांचे लग्न 
संबंधित वृद्धाला पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी असून, सर्वांचे विवाह झालेले आहेत. शिवाय मुलीच्या मुलीचेही लग्न ठरले आहे. नातीआधीच आजोबाने पुन्हा ‘बार’ उडवल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.