रॉबर्ट वाड्रांच्या प्रियंकाविषयीच्या ‘त्या’ पोस्टनं सोशल मीडियावर खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रियंका गांधी आज लखनऊमध्ये रोड शो करत आहेत. त्यांच्या साथीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील आहेत. अशातच आता प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुकवर एक भावुक पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सोशलवर व्हायरल होताना दिसत असून त्यामुळे एकच खळबळ उडाल्याचे दिसत आहे.

‘तू माझी खरी मैत्रीण आहेस. योग्य सहचारिणी आणि माझ्या मुलांसाठी चांगली आई असल्याचं तू सिद्ध केलं आहेस. परंतु आजची राजकीय परिस्थिती दुर्भाग्यपूर्ण आहे. मला माहीत आहे की, तू तुझी जबाबदारी योग्य पद्धतीनं निभावशील’ असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

इतकेच नाही तर, पुढे आपल्या पोस्टमध्ये रॉबर्ट वाड्रा लिहितात, ‘मी प्रियंकाला देशासाठी अर्पण करतो. भारतीय जनतेनं त्यांची काळजी घ्यावी.’ राॅबर्ट वाड्रांची ही फेसबुक पोस्ट भावूक असली तरी ती चर्चेचा विषय ठरत आहे. शिवाय ती पोस्ट सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

काँग्रेसच्या महासचिवपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुका विचारात घेता आज प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. प्रियंका राजकारणात सक्रिय होत असल्याच्या निमित्तानं काँग्रेसनं राज्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी प्रियंका यांच्या खांद्यावर आहे. समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टीच्या महाआघाडीचा आणि सत्ताधारी भाजपाचा मुकाबला करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

आज रोड शोच्या निमित्ताने लखनऊमध्ये काँग्रेसने प्रियंका आणि राहुल गांधींचे पोस्टरदेखील लावले होते. विमानतळापासूनच त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. प्रियंका यांच्या रोड शोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह खासदार ज्योतिरादित्य सिंधियादेखील उपस्थित आहेत. सिंधिया यांच्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. ‘बदलाव की आंधी, प्रियंका गांधी’ अशा घोषणा रोड शो दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.

इतकेच नाही तर रोड शोदरम्यान राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. राफेलवरून त्यांना लक्ष्य केलं आहे. बसमधून रोड शो करत असताना त्यावेळी त्यांच्या हातात राफेल विमानाचं कट आऊट पाहायला मिळालं. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातातही राफेलचं कटआऊट पाहायला मिळालं. शिवाय उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर है अशी घोषणाबाजी केली.