१५ मिनीटात सराफ दुकानातील लाखोंचा ऐवज लंपास

कोल्‍हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीच्या परिसरातील सराफा दुकानांवर चोरट्यांनी बुधवारी (दि.६) रात्री डल्ला मारला. चोरट्यांनी अवघ्या १५ मिनीटात दुकानातील २२ लाखांचा ऐवज चोरुन नेला. चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे सराफ व्यवसायिकांमध्ये खळबळ उडली आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली.

जोतिबा रोडवरील कोलेकर-देसाई आणि गंगावेश रोडवरील महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये चोरीचा हा प्रकार घडला आहे. मोटारीतून आलेला तीन चोरट्यांनी दुकानातील तिजोरीच उचलून नेली आहे. सुमारे ६० तोळे सोने, ११ किलो चांदी आणि दुकानातील रोकड असा सुमारे २२ लाखांचा ऐवज चोरट्योनर लंपास केला. मध्यरात्री ३ वाजून ४८ मिनिटांनी चोरटे दाखल झाले. त्यानंतर १५ मिनिटांत हा प्रकार घडला. या चोरीचा हा प्रकार परीसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

दरम्‍यान, या घटनेची माहिती पोलिसांना समजताच शहर उपअधीक्षकांसह पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथके रवाना करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.