सीबीआयचे (CBI) हंगामी प्रमुख राव यांच्या नियुक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीआयचे हंगामी संचालक एम. नागेश्वर राव यांच्या नियुक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे.  कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेने आज ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल करत राव यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समितीने आलोक वर्मा यांची सीबीआय संचालकपदावरून उचलबांगडी करताना सीबीआय प्रमुखपदाचा हंगामी पदभार नागेश्वर राव यांच्याकडे सोपवला आहे. या नियुक्तीला कॉमन कॉजने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. केंद्राकडून करण्यात आलेली राव यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे सीबीआय प्रमुखपदाच्या वादात आणखीही नाट्यमय घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, राव यांनी सूत्रे स्वीकारताच आलोक वर्मा यांनी घेतलेले सर्व निर्णय तत्काळ प्रभावाने बदलले होते. तर वर्मा यांनी बदली धुडकावत थेट प्रशासकीय सेवेचाच राजीनामा दिलेला आहे.