महादेव जानकरांचा लोकसभा मतदारसंघ ठरला

वालचंदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आणि राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर लोकसभेची निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढणार हे नक्की झालं आहे. जानकर बारामती लोकसभा मतदारसंघातून लढविणार आहेत. त्यामुळे रासपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासून निवडणूकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन रासपच्या प्रदेश सचिव डॉ.अर्चना पाटील यांनी केले. इंदापूर तालुक्यामध्ये रासपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी सांगितलं.

लोकसभेच्या निवडणुकीला कमी कालावधी राहिला आहे. रासपचे संस्थापक महादेव जानकर लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत. इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तालुक्यातील बूथ यंत्रणा मजबूत करण्यावरती भर द्यावा. एक बूथ दहा यूथ ही संकल्पना राबवावी. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचून जास्तीजास्त कामे करण्याचा प्रयत्न करावा. विजयी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच जनसंपर्क सुरू करावा, असं अर्चना पाटील यांनी सांगितलं.

बैठकीत बूथ कमिटीच्या सदस्यांची नेमणूक करण्यात आली. तसंच या सदस्यांना पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रही देण्यात आले.

दरम्यान, बारमती राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुले राष्ट्रवादीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी जानकरांनी कंबर कसली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महादेव जानकर पुन्हा समोरासमोर असणार आहेत.