विखे रासपाच्या संपर्कात : महादेव जानकरांचा दावा

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन-विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे हे लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा पक्षाचे अध्यक्ष दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज नगर दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना केला.
जानकर म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या जागेची राष्ट्रीय समाज पक्ष ‘एनडीए’कडे मागणी करणार आहे. जिल्ह्यातील डॉ. सुजय विखे, निलेश लंकेसह इतर काही नेते आमच्या संपर्कात आहेत. आत्ताच कुणाची नावे जाहीर केल्यास अडचणी निर्माण होतील.

लोकसभा निवडणूक आम्ही ‘एनडीए’सोबतच लढणार आहोत. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही ‘नगर दक्षिण’सह बारामती, माढा, हिंगोली अशा पाच जागांची मागणी केली आहे. युती झाली तर आम्हाला दोन जागा मिळाव्यात, अशी आमची माफक अपेक्षा आहे. लोकसभेसाठी मी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मला बारामतीबद्दल विशेष प्रेम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपाने शिवसेनेशिवाय निवडणूक स्वतंत्र लढविली, तर नगर दक्षिणची जागा आम्हाला मिळावी, यासाठी आग्रही राहणार आहोत. मी स्वतःही नगर दक्षिणमधून निवडणूक लढवू शकतो, असे वक्तव्यही जानकर यांनी यावेळी केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

डॉ. सुजय विखे हे लोकसभा निवडणुकीचे अनेक महिन्यांपासून तयारी करीत आहेत. दक्षिणेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने विखे यांनी ‘वडील काँग्रेसमध्ये आहेत म्हणून मीही काँग्रेसमध्ये राहिले पाहिजे, असे काही नाही.’ असे खळबळजनक वक्तव्य केले होते. मात्र त्या विधानावरून वाद तयार झाल्यानंतर त्यांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचा बचाव केला होता. मी निवडणूक लढविण्यास इच्छुक असून काँग्रेसकडून उमेदवारी मागणार आहे, असे सांगितले. आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष जानकर यांनी डॉ. विखे हे रासपाच्या संपर्कात असल्याचे विधान केल्याने नव्या राजकीय समीकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.