महाडिक – मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या संवाद कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक आणि प्रा. संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांत जुंपली. रिचेबल आणि नॉट रिचेबलच्या आरोप-प्रत्यारोपावरून झालेल्या वादामुळे परिस्थिती तणावाची बनली. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यांनतर परिस्थिती निवळली. या प्रकाराची परिसरात सर्वत्र चर्चा सुरू होती.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एका खासगी वृत्तवाहिनीने इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षांचे नेते आणि नागरिक यांच्या चर्चेचा कार्यक्रम दसरा चौकात आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई व्यासपीठावर होते. समोर मोठ्या संख्येने मंडलिक आणि महाडिक गटाचे कार्यकर्ते होते.

या कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये असलेल्या वीरेंद्र मंडलिक यांनी नव्या शिवाजी पुलासाठी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीच निधी मिळवून दिला; त्याचे श्रेय मंडलिकांनाच आहे, असे सांगितले. याला आक्षेप घेत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, की वीरेंद्र यांना काही माहिती नाही. पुलाच्या कामात आलेल्या अनंत अडचणी दूर करण्याचे काम आपण केले. पुलाच्या श्रेयवादावरून वीरेंद्र मंडलिक आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

त्यांनतर खासदार महाडिक म्हणाले की ,’माझे राजकीय प्रतिस्पर्धी असणारे संभाव्य उमेदवार सायंकाळी सातनंतर नॉट रिचेबल असतात. आता कोठे आहेत? मी येथे आहे, ते कोठे आहेत? ते बाराला उठतात, आजही या चर्चेला ते का आले नाहीत, ते कोठे आहेत, अशी विचारणा उपस्थित श्रोते आणि टीव्ही चॅनेलच्या अँकरला केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रेक्षकांत असणारे वीरेंद्र मंडलिक व त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

दोन्ही समर्थक आमनेसामने आल्याने वादाला प्रारंभ झाला. प्रचंड घोषणाबाजीमुळे तणाव वाढला. गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांना बोलावून हस्तक्षेप करावा लागला. यानंतर वातावरण शांत झाले.या वादातून आगामी लोकसभा निवडणूक कोणत्या थराला जाऊ शकते, याची चर्चा उपस्थितांत सुरू होती.