वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांचा ७ जानेवारीला राज्यव्यापी संप

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी ७ जानेवारी रोजी राज्यव्यापी संप तर दि.८ व ९ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे महावितरणच्या कामावर परिणाम होणार असल्याने यावर कोणती उपाययोजना केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण व जीवनावश्यक वस्तूंच्या सट्टाबाजारावर बंदी यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून महागाईवर नियंत्रण आणणारी प्रभावी पावले उचलावीत, रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना करून बेरोजगारीवर नियंत्रण आणा, ग्रामीण व शहरी भागात मागेल त्याला किमान वेतन मिळणाऱ्या कामाची हमी द्या व त्याची अंमलबजावणी करावी, कोणताही अपवाद न करता किंवा कोणालाही सूट न देता सर्व ठिकाणी कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिक्षेच्या कारवाईची तरतूद करावी.

सर्व कामगारांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा लागू करा, सर्व क्षेत्रांमधील सर्व प्रकारच्या कामगार, कष्टकऱ्यांना महागाई भत्त्यासहित कमीत कमी १८ हजार रुपये किमान वेतन लागू करा, शेतमजूर, गरीब शेतकरी व असंघटित कामगारांसहित सर्व कष्टकऱ्यांना कमीत कमी ६००० रुपये मासिक पेन्शन लागू करा, केंद्रीय व राज्यांच्या सार्वजनिक क्षेत्र उद्योगांमधील निर्गुंतवणुक थांबवा, वर्षभर चालणाऱ्या कायम कामांमधले कंत्राटीकरण थांबवा आणि कंत्राटी कामगारांना त्याच प्रकारचे व समान काम करणाऱ्या कायम कामगारांसारखेच वेतन व अन्य लाभ द्या, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.