सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा माहेश्वरी समाजाकडून निषेध

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी माहेश्वरी समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा येथील माहेश्वरी समजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. तसेच गुरूवारी (दि.१०) येथील तहसीलदार देशमुख यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.

सदरील निवेदनात म्हटले आहे की, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नागपूर येथील कार्यक्रमात माहेश्वरी समाजाच्या भावना दुखावणारे बेताल वक्तव्य केले होते. माहेश्वरी समाज हा देशातच नव्हे तर विदेशातही तेथील समाजाशी एकरूप होऊन तेथील विकासासाठी सदैव विधायक कार्यात अग्रेसर आहे. हा समाज स्वत: परिश्रम करून इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देतो. तसेच या समाजाने ईतर कोणत्याही समाजात कधीही तेढ निर्माण केली नाही. अशा पुरोगामी विचाराच्या मारवाडी समाजाबद्दल देशातील व राज्यातील मोठमोठी वैधानिक पदे भूषविलेल्या व्यक्तिच्या संकुचीत मनोवृत्तीचा निषेध करण्यात येत आहे.

दरम्यान, सेलू तालुका सकल राजस्थानी समाज बांधवांनी येथील मोंढा भागातील मारोती मंदिरापासून सेलू तहसील कार्यालयापर्यंत काळ्याफिती लावून मोटारसायकल रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निषेध रॅलीत माहेश्वरी समाजातील सर्व जाती, पोटजातीचे समाज बांधव सहभागी झाले होते.