लग्न पत्रिका वाटत असतानाच वडिलांना मुलगा शहीद झाल्याची बातमी कळाली 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश शोक सागरात बुडाला आहे. गावोगावी शहिदांना श्रद्धांजली वाहणारे फलक झळकू लागले आहेत. भारतीय जवानांच्या आहुतीला सलाम करण्यासाठी देशभक्तीपर गीते गाऊन चौका चौकात राष्ट्रध्वज लावून सैनिकांच्या बलिदानाला नमन केले जाते आहे. अशा शोकाकुल वातावरणात काल शनिवारी आणखी एक हृदय हेलावणारी घटना सर्वांच्या समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात नौसेरा सेक्टरमध्ये आयईडी डिफ्यूज करताना मेजर चित्रेश सिंह बिष्ट शहीद झाले आहे. ते ३१ वर्षांचे होते. त्यांचे येत्या ७ मार्च रोजी लग्न होते.

मेजर चित्रेश सिंह बिष्ट हे उत्तराखंड पोलीस खात्यात पोलीस निरीक्षक असणाऱ्या एस.एस बिष्ट याचे पुत्र आहेत. शाहिद मेजर चित्रेश सिंह बिष्ट रानीखेत पिपली गावचे रहिवासी आहेत. त्यांनी महू येथील लष्करी छावणीत सैन्याचे खडतर प्रशिक्षण घेतले होते. तसेच २८ फेब्रुवारी पासून मेजर चित्रेश लग्नाच्या सुट्टीला येणार होते. वडील मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटत असताना त्यांना मुलगा शहीद झाले आहे अशी हृदयद्रावक बातमी मिळाली. हा सर्व प्रसंग ऐकणाऱ्याच्या प्रत्येक लोकांच्या डोळ्यात पाणी उभा राहत आहे. कारण मुलगा बोहल्यावर चढताना पाहण्याच्या एवेजी त्याच्या पार्थिवाला मुखांग्नी देण्याची वेळ मेजर चित्रेश सिंह यांच्या वडिलांवर आली आहे. आज रविवारी मेजर चित्रेश सिंह यांचे पार्थिव हवाई मार्गाने देहरादूनला येण्याची शक्यता आहे.

सैन्याचे ४२ जवान शहीद झाल्याचे दुःख कमी होते ना होते तोच देशापुढे  मेजर चित्रेश सिंह यांच्या शहीद होण्याची बातमी आली. जम्मू कश्मीरमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हाय आलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतर सैन्याला सीमेची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. सीमेची पहाणी करत असतानाच  मेजर चित्रेश सिंह यांच्यावर काळाने घाला घातला आहे.