मकर संक्रातीच्या दिवशी ‘या’ कारणामुळे परिधान केले जातात काळे वस्त्र 

पोलीसनामा ऑनलाइन : (ओंकार लिंबेकर) – मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा सण. सौर कालगणनेशी संबंधित हा महत्वाचा भारतीय सण मानला जातो. भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांमध्ये उगवलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी,तीळ इत्यादी सुगडात भरून त्या देवाला अर्पण केल्या जातात. इंग्रजी नववर्षानंतर हिंदूंचा हा पहिला सण आहे. त्यामुळे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सर्वजण आपापल्या मनातील रुसवे फुगवे दूर सारून सर्वांशी प्रेमाने बोलून एकमेकांना तिळगुळ वाटून तोंड गोड करण्याची प्रथा आहे. हा सण प्रतिवर्षी जानेवारी महिन्याच्या १४ किंवा १५ तारखेला नित्यनियमाने येत असतो.
मकर संक्रांतिचे हे आहे भौगोलिक कारण…
प्रतिवर्षी २१ ते २२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडत असतात. त्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते.इसवीसन सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. त्यामुळे या साडेतेवीस दक्षिण अक्षवृत्ताला मकरवृत्त असे देखील म्हणतात.या पुढील काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१ ते २२ डिसेंबरला होत राहिली,तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली.आणि आता हा सण १४ किंवा १५ जानेवारी रोजी मकर संक्रातीचा दिवस साजरा केला जातो.त्याचबरोबर हा सण भारतात वेगवेगळ्या नावाने साजरा करण्यात येतो. लोहडी, बिहु, पोंगल अशी अनेक नावे या सणाला दिलेली आहेत. महाराष्ट्रात या सणाला मकर संक्राती असं म्हणतात. हा सण एकूण तीन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवसाला भोगी असे म्हणतात.दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी बालगोपालांसह सर्वच मंडळी आकाशात रंगीबेरंगी पतंग उडताना दिसतात. सर्वांच्या घरी तिळाच्या लाडूंची रेलचेल असते. या दिवशी काळे कपडे परिधान करण्याला जास्त महत्व असते.

का असते ‘या’ दिवशी काळ्या कपड्यांना जास्त महत्व ?
नवविवाहित वधूचे विवाहानंंतर पहिल्यांदा हळदीकुंंकू संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे. या दिवशी सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावण्यात येतं त्याचबरोबर पहिल्या संक्रातीला नववधूला काळ्या रंगाची साडी भेट देण्यात येते.आणि तिला हलव्याचे दागिने परिधान केले जातात. अनेकांना प्रश्न पडतो भारतीय संस्कृतीत तर काळ्या रंगला अशुभ मानले जाते. मग काळ्या वस्त्रांना संक्रांत या एकमेव सणाच्या दिवशी काळ्या रंगला महत्व का दिले जाते ? तर जाणून घ्या, या मागिल कारण संक्रांत हा सण ऐन थंडीच्या दिवसात येतो. काळी वस्त्र उष्णता शोषून घेतात आणि शरीराला उब देतात म्हणून या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे.