मकर संक्रांत शुभ की अशुभ ? काय आहे तथ्य ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आज मकर संक्रांत … ! आजच्या दिवसापासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणूनच याला मकर संक्रांत असे म्हंटले जाते. खरंतर आपल्याकडे ‘संक्रांत आली’ असा वाकप्रचार केला जातो. संक्रांत येणे म्हणजे त्या व्यक्तीसोबत काहीतरी वाईट घडणे. अशा अर्थाने ‘संक्रांत आली’ हा शब्दप्रयोग वापरला जातो. याबरोबरच संक्रांत शुभ की अशुभ अशी शंका देखील अनेकांच्या मनात येते. त्याचं शास्त्रशुद्ध उत्तर ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी एका माध्यमाशी बोलताना दिले आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो. या दिवसापासून दिवस मोठा आणि रात्र लहान होण्यास सुरुवात होते. म्हणजेच, अंधार कमी होऊन प्रकाशाचं पर्व सुरू होतं. या दिवशी आपण तीळगूळ वाटून स्नेह वृद्धिंगत करतो, गोडवा पसरवतो, आकाशात पतंग उडवून आनंद साजरा करतो, असा दिवस अशुभ असूच शकत नाही, असं दा. कृ. सोमण यांनी अगदी ठामपणे सांगितले. संक्रांत येणं हा वाक्प्रचार कुठून आला ठाऊक नाही, पण संक्रांत या सणाचा आणि वाईटाच किंवा संकटाचा काहीच संबंध नाही, असं ते म्हणाले.
काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा 
काहीजणांच्यात काळी कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते. पण संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घालण्याची प्रथा आहे. या काळ्या रंगामुळेही काहींच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. पण, मुळात काळा रंग काही अशुभ नाही आणि संक्रांतीला हा रंग वापरण्यामागचं कारण वातावरणाची संबंधित आहे,  काळ्या रंगाची वस्त्रे या थंडीच्या दिवसात शरीर उबदार ठेवतात. म्हणून काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. असेही सोमण यांनी स्पष्ट केले.
मकर संक्रांतीचे महत्व 
मकरसंक्रांत हा भारतातील एक शेतीसंबंधित सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकर संक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता, सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (१४ जानेवारी), संक्रांत (१५ जानेवारी) आणि किंक्रांती (१६ जानेवारी) अशी नावे आहेत. संक्रांतीला आप्तस्वकीयांना तिळगुळ आणि वाण वाटून `तिळगुळ घ्या आणि गोड बोला` असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्यासाठी शुभेच्छा देतात. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात.