शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करा : महापौर जाधव 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन-पिंपरीचिंचवड महापालिका हद्दीतील सर्व अंतर्गत आणि मुख्य रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर बेवारस वाहने उभा असून ती तातडीने काढून नागरिकांसाठी रस्ता मोकळा करावा, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत.

शहरातील वाहतूक नियोजनाबाबत बुधवारी महापौर दालनात बैठक झाली. वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त निलीमा जाधव, निगडी वाहतूक पोलीस निरीक्षक रवींद्र निंबाळकर, हिंजवडी विभागाचे किशोर म्हसवडे, महापालिकेचे परिवहन कक्षप्रमुख श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, उपअभियंता विजय भोजने, अनिल भोईर उपस्थित होते.

तरुणावर तलवारीने सपासप वार करुन खूनाचा प्रयत्न 

महापालिका हद्दीतील आणि लगतच्या भागातील वाहतूक सुरळीत होणेच्या दृष्टीकोनातून नियोजन करावे. नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. महापालिका हद्दीतील सर्व अंतर्गत आणि मुख्य रस्त्यावरील बेवारस वाहने तातडीने हटविण्यात यावीत. नागरिकांसाठी रस्ता खुला करण्यात यावा. शहरामध्ये पार्किंग बाबत योग्य ते धोरण राबवून वाहनांना शिस्त लावण्यात यावी, अशा सूचना महापौर जाधव यांनी पोलिसांना केल्या.

वाहतूक पोलिसांनी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी त्यांना येत असलेल्या अडचणी सांगितल्या. अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांसाठी वाहतूक बॅरीकेट्स आणि जॅमर देण्याची मागणी केली. त्यावर महापौर जाधव यांनी महापालिकेतील विद्युत, स्थापत्य आणि बीआरटीएस विभागातील अधिका-यांना वाहतूक शाखेसाठी आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या.