तरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी

दिल्ली : वृत्तसंस्था – अंधश्रध्दा समाजाला लागलेली किड आहे व ती दुर करण्यास सर्वांनी प्रयत्न करणयाचे आवाहन करण्यात येत आहे. भोंदुबाबा आपणास कसे फसवतात हे देखील लोकांना समजावून सांगण्यात येते असले तरी याकडे दुर्लक्ष केले जाते. राजधानी दिल्लीमध्ये ऐन दिवाळीत अंधश्रद्धेमुळे एकाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिसरात राहणाऱ्या तरुणीला वश करण्यासाठी एका विवाहित पुरुषाने एका घुबडाचा बळी दिला. तर दुसऱ्याच दिवशी या व्यक्तीच्या घरातून त्याच्या वडिलांचा मृतदेह पोलिसांना सापडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हा अंधश्रद्धेचा बळी असल्याची चर्चा परिसरात आहे. मध्यरात्री ही तंत्र विद्या करणाऱ्या कन्हैया लाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिल्लीतील सुल्तानपुरी भागात राहणारा ४० वर्षीय कन्हैया लाल ड्रायव्हर आहे. त्याचे लग्न झाले असून त्याला ३ मुलं आहेत. परंतु, त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीच्या तो प्रेमात पडला आणि तिला वशमध्ये करण्यासाठी त्याने तंत्र मंत्राचा वापर सुरू केला. ज्या तरुणीला वश करायचे तिचे केस आणि घुबडाचे पिस एकत्र गुंफून त्याची पूजा करायची असा सल्ला त्याला एका मांत्रिकानं दिला. त्यानुसार, कन्हैयाने आपल्या मेव्हण्याकडून एक घुबड मागवले आणि रोज मध्यरात्री उठून तो ही अघोरी पूजा करू लागला.

दिवाळीच्या पहिल्या रात्री त्याने ही पूजा सुरू केली. परंतु, कन्हैयाच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने त्याच्या शेजाऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी कन्हैयाच्या घराची झडती घेतल्यावर त्यांना एका खोलीत कन्हैयाच्या वडिलांचा मृतदेह सापडला. शिवाय, त्याच्या घरी असलेल्या कूलरमध्ये मृत घुबड सापडले. तरुणीला वश करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचा खुलासा त्याने पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर केला. शिवाय त्याने पोलिसांना ही पूजा कशी करायची यासंबंधीचा यूट्यूबवर असलेला एक व्हिडिओदेखील दाखवला.