Manikarnika Review : कंगनाने पेललं अभिनयाचे शिव धनुष्य !

पोलीसनामा ऑनलाइन : अनेक विवादानंतर ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपट रिलीज झाला. झाशीची राणी लक्ष्मी बाई यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत होते. कंगना रानौतने या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली आहे. कंगना आतापर्यंत अनेक बोल्ड आणि ग्लॅमरस भूमिकेत दिसली परंतु या चित्रपटातील तिच्या अभिनयाला पाहून तिच्याकडे बघण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. या चित्रपटात कंगनाने राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेला योग्य प्रकारे न्याय दिला आहे. हा चित्रपट देश भक्तीवर आधारित असल्याने हा चित्रपट गणतंत्र दिवसाच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला आहे.

चित्रपटाची कथा अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने सुरु होते. जिच्या बलिदानानं ही भारतभूमी पावन झाली, जिची शौर्यगाथा इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरात कोरली गेली ती राणी लक्ष्मीबाई नेमकी होती कशी ?, याचं सुरूवातीलाच बच्चन यांनी केलेलं वर्णन चित्रपटाबद्दल कुतूहलं निर्माण करतं. या नंतर मनू उर्फ ‘मणिकर्णिका’ म्हणजेच कंगनाची एंट्री दाखवली आहे. मनुचे वडील पेशवांच्या दरबारात सल्लागार म्हणून काम करत असतात. त्यामुळे ती लहानाची मोठी राजवाड्यातच होते. मनु वेद-पुराण, घोडस्वारी आणि तलावर बाजीमध्ये तरबेज असते. झाशीमधल्या राजे गंगाधर राव यांच्याशी मनुचा विवाह होतो आणि इथून पुढे सुरु होते ती मनुच्या मणिकर्णिका ते झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या प्रवासाला सुरुवात.

झाशीत आल्यावर मणिकर्णिका इंग्रजांविरोधात लढा उभारते. लग्नानंतर काही महिन्यात राणी लक्ष्मीबाईंना आई होणार असल्याची चाहुल लागते. दामोदर नावाच्या गोंडस बाळला त्या जन्म देतात. मात्र काही दिवसांतच दामोदरचा मृत्यू होतो. दमादोरच्या मृत्यूनंतर गंगाधर राव आणि लक्ष्मीबाई गादीला वारसदार हवा म्हणून मुलाला दत्तक घेतात. त्यानंतर काही दिवसांनी गंगाधर राव यांचादेखील मृत्यू होतो. राणी लक्ष्मीबाईंना इंग्रज त्यांच्याच महालातून बाहेर काढतात. त्यानंतर सुरुवात होते ती पहिला स्वातंत्र्य संग्रामाला. राणी लक्ष्मीबाई इंग्रजांविरोधात मैदानात उतरते. ती युद्ध पुकारते. यायुद्धात तिला साथ मिळते ती झलकारी बाई, (अंकिता लोखंडे) तात्याराव टोपे (अतुल कुलकर्णी), पुरण सिंग(वैभव तत्तवादी) आणि गुलाम मोहम्मद खान (डॉनी डेंझोपा) यांची.

चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाविषयी सांगायचे तर या रोलसाठी तीच  योग्य आहे असे चित्रपट पाहिल्यानंतर वाटते . पण सिनेमात काही ठिकाणी तिची संवाद फेक कौशल्य  खास  वाटणार नाही. पण काही ठिकाणी तिचे असे दमदार डायलॉग आहे ज्यावर शिट्ट्या आणि टाळ्या वाजतात. झलकारीबाईच्या रूपात अंकिता जास्त वेळ पडद्यावर दिसत नाही. पण तिच्या पहिल्याच चित्रपटात ती आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. चित्रपटातील डॅनी यांचा अभिनय पाहून असे वाटते यांच्या अभिनयाची धार अजूनही कायम आहे. तसेच चित्रपटात कुलभूषण खरबंदा आणि सुरेश ओबेरॉय यांनी सुद्धा आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.

मणकर्णिका चित्रपटाची कथा लक्षात घेऊन योग्य प्रकारे डायरेक्शन करण्यात आले आहे. चित्रपटाचा खास भाग या चित्रपटातील एक्शन दृश्य आहे. मग ते कंगनाची असो  किंवा तिच्या सहयोगी कलाकारांचे. या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सुद्धा तलवारबाजी करताना दिसते. चित्रपटातील शेवटचे चाळीस मिनिट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. चित्रपटातील पहिला भाग प्रेक्षकांना कंटाळवाणा वाटू शकतो. चित्रपटातील गाण्याचा आणि दृशांचा ताळमेळ लागताना दिसत नाही. पण या चित्रपटातील इंग्रजांबरोबरील युद्धाचे दृश्य प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारे आहे. ज्याप्रकारे देशसेवेत आपले प्राण पणाला लावून लढताना कंगना दाखवली आहे. त्यामुळे ती कौतुकास पात्र ठरते हे नक्की.

बॉक्स ऑफिसवर कंगनाच्या या चित्रपटाची टक्कर नवाजुद्दीनच्या ‘ठाकरे’ चित्रपटाशी होणार आहे. ‘मणिकर्णिका’ची पहिल्या दिवसाची कमाई १३ ते १५ करोड होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण ‘ठाकरे’ चित्रपटामुळे या चित्रपटाला थोडे नुकसान होऊ शकते. आमच्या कडून या चित्रपटाला मिळतात ३.५ स्टार रेटिंग.