कैदी मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणाचा खटला सुरू

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – कैदी मंजुळा शेट्ये हिचा मुंबईतील भायखळा तुरुंगात मृत्यू झाला होता. कैद्यांना खाद्यपदार्थ वाटप करताना झालेल्या वादातून तुरूंग कर्मचाऱ्यांनी तिला बेदम मारहाण केल्याने अत्यावस्थ झालेल्या मंजुळा शेट्येने रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. या वादग्रस्त घटनेप्रकरणी तुरुंगातील सहा महिला कर्मचाऱ्यांविरुद्ध आता खटला सुरू झाला आहे. यावेळी तपासादरम्यान भायखळा तुरुंगाचा नकाशा तयार करणाऱ्या पहिल्या साक्षीदाराची साक्ष विशेष सरकारी वकील विद्या कासले यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शायना पाटील यांच्यासमोर नोंदवली.

एल्गार परिषदेमुळेच कोरेगाव-भीमा हिंसाचाराची व्याप्ती वाढली : पुणे पोलीस 

एका गुन्ह्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मंजुळाचा (४५) तुरुंगात अमानुष मारहाण झाल्याने गेल्या वर्षी २३ जूनला मृत्यू झाला होता. दोन अंडी व पाच ब्रेडच्या वाटपाच्या मुद्द्यावरून या महिला तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी मंजुळाला बेदम मारहाण केली आणि त्यात अत्यंत गंभीर जखमी झाल्याने तिचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला, असा आरोप आहे.
याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाअंती तुरुंग अधिकारी मनिषा पोखरकर तसेच कॉन्स्टेबल बिंदू नायकडे, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे व आरती शिंगणे यांच्याविरुद्ध सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. गुरुवारी साक्ष नोंदवण्यात आलेल्या साक्षीदाराने भायखळा महिला तुरुंगाचा आराखडा न्यायालयात समजावून सांगितला. त्यानंतर या साक्षीदाराची उलटतपासणी करण्याच्या दृष्टीने तुरुंगाला भेट देण्याची अनुमती द्यावी, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी केली. तेव्हा, यासंदर्भात बचाव पक्षाने तुरुंग अधीक्षकांकडे परवानगी मागावी, असे निर्देश देऊन न्यायाधीशांनी दिले आहेत. पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला होणार असल्याचेही न्यायाधीशांनी सांगितले.