‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ वर बोलण्यास मनमोहन सिंग यांचा नकार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर काल गुरुवारी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातील संवादाला आणि सजवण्यात आलेल्या पात्राला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मात्र ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटावर बोलण्यासाठी मात्र मनमोहन सिंग यांनी नकार दिला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन मनमोहन सिंग यांनी या चित्रपटावर बोलण्याचे टाळले आहे. आज शुक्रवारी काँग्रेसच्या १३४ व्या वर्धापनदिनानिमित्त २४ अकबर रोड येथे मनमोहन सिंग आले असता त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे.

पंतप्रधान पदी असताना मनमोहन सिंग यांचे आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहणारे संजय बारू यांनी लिहलेल्या ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित चित्रपट काढण्यात आला असून यात काँग्रेस नेत्यांची बदनामी करण्यात आली आहे.असा आक्षेप काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाने काँग्रेसच्या अडचणीत वाढ होणार असून काँग्रेसने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला आहे.  लोक पुस्तके अधिक वाचत नाहीत परंतु चित्रपट अधिक बघतात म्हणून काँग्रेसला या चित्रपटाच्या प्रदर्शनाने अधिक भीती वाटत आहे कारण त्यांच्यावर संजय बारूंनी पुस्तक लिहले तेव्हा त्यांनी त्या पुस्तकाचा एवढा विरोध केला नव्हता तसेच आता कुठे काँग्रेसला चांगले दिवस येऊ लागले आहेत. अशातच हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराला उजाळा मिळणार आहे असे काँग्रेसला वाटते आहे.

गुरुवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच भाजपने लगेच आपल्या ट्विटर हँडलवर या ट्रेलरचे रिट्विट केले. त्यावर काँग्रेसचे खासदार पी. एल. पुनिया यांनी या चित्रपटाला भाजपची खेळी असल्याचे मानले. भाजपला काहीच दाखवण्या सारखे राहिले नाही म्हणून भाजप काँग्रेसची बदनामी करत आहे. परंतु भाजपने हे समजून घेतले पाहिजे कि आता तुमचे दिवस खूप थोडे राहिले आहेत असे पुनिया म्हणाले आहेत.पुनिया यांच्या वक्तव्यावर भाजपने अद्याप आपले मत व्यक्त केले नाही.

तर मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणारे अनुपम खैर यांनी मनमोहन सिंग यांची भूमिका करणे खूपच अवघड गेल्याचे म्हणले आहे. मनमोहन सिंग यांचा आवाज काढणे किती अवघड गोष्ट होती हे सांगताना खैर म्हणाले कि आपण मनमोहन सिंग यांच्या आवाजाच्या अभ्यासासाठी त्यांच्या भाषणाचे व्हिडीओ साधारण शंभर तास बघितले असतील तर मनमोहन सिंग यांचे पात्र साकारण्यासाठी त्यांना ६ते ७ महिने तयारी करावी लागली असे अनुपम खैर म्हणाले आहेत.