मेगा भरती : मराठा विद्यार्थ्यांना ‘एसईबीसी’ पर्याय खुला परंतु जागांचा प्रश्न कायम

बीड : पोलीसनामा आॅनलाईन: मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर मेगा भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा फायदा उमेदवारांना होणार असे आश्वासन सरकारने दिले होते. नुकतीच एमपीएससीकडून 342 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. परंतु यात एसईबीसीसाठी पर्यायच नसल्याचं समोर आलं. यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घेता येत नसल्याचे दिसून आले. एसईबीसीसाठी पर्यायच नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार कसा? असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान ही बाब लक्षात घेत आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक जाहीर करून तशी तरतूद एमपीएससीच्या अधिकृत पोर्टलवर केली आहे.
आता मराठा विद्यार्थ्यांना ‘एसईबीसी’ पर्याय खुला झाला असला तरी अद्याप आठ टक्के जागांचा प्रश्न मात्र कायम असल्यांच चित्र दिसत आहे. 342 जागांसाठीच्या भरतीच्या जाहिरातीतील विविध पदांसाठी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जी माहिती अपलोड करायची आहे, ती माहिती भरली जात नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थी बुचकळ्यात पडले होते.
एमपीएससीने मोठ्या प्रतिक्षेनंतर 342 जागांसाठी जाहिरात काढली. मात्र मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या कोट्यातून फॉर्म भरण्याची व्यवस्थाच नव्हती. एमपीएससीच्या साईटवर अद्याप सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठीची माहिती भरता येत नव्हती. यात आता एमपीएससीने सुधारणा केल्या आहेत. मुख्य म्हणजे ही जाहिरात प्रकाशित होऊन सहा दिवस झाले आहेत.
16 टक्के आरक्षण असतानाही आठ टक्केच फायदा?
एमपीएससीने 342 जागांसाठी जाहिरात काढल्यानंतर  अनेक विद्यार्थी नोकरी भरतीच्या जाहिरातीनंतर फॉर्म भरण्यासाठी गर्दी करत दिसताना दिसत आहेत. परंतु हा फाॅर्म भरतानाची एक अडचण म्हणजे मराठा समाजातील मुलांना साईटवर आपला प्रवर्ग बदलता येत नव्हता. या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी इतर समाजातील मुलांसाठी त्यांच्या वेगळ्या प्रवर्गाची सोय या साईटवर करण्यात आली होती. दरम्यान या समस्येबाबत अनेक विद्यार्थ्यांनी आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यासाठी विद्यार्थ्यांनी  ई-मेलही केले होते. दरम्यान या सगळ्यानंतर  यात आता  एमपीएससीने सुधारणा केल्या आहेत. दरम्यान या जाहिरातीवर नजर टाकल्यावर मराठा  समाजातील मुलांना प्रत्यक्षात 8 टक्के इतकाच फायदा होणार आहे असे दिसत आहे. परंतु  मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळणे अपेक्षित आहे.