‘सैराट’ येणार मालिकेच्या रुपात ?

मुंबई : वृत्तसंस्था – दोन वर्षांपूर्वी सैराट या चित्रपटाने १०० कोटी आकडा पार केला होता. प्रचंड प्रसिद्धी मिळवलेल्या सैराटवर आधारित हिंदी मालिका लवकरच छोट्या पडद्यावर येणार अल्याची चर्चा आहे. सैराटनं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेड लावलं होतं, चित्रपटातील ‘झिंगाट’सारखी थिरकायला लावणारी गाणी, खळखळून हसवत शेवटी विचार करायला लावणारी कथा, टाळ्या-शिट्ट्या मिळवणारे आर्ची-परश्याचे डायलॉग्स…अशी ‘सैराट’ भट्टी नागराज मंजुळे यांनी दोन वर्षांपूर्वी चित्रपटाच्या माध्यमातून जमवली.
मराठी चित्रपटांमध्ये ‘सैराट’च्या यशानंतर आता हा चित्रपट छोट्या पडद्यावर मालिकेच्या रुपात दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैराटवर आधारित या मालिकेचे दिग्दर्शन राजेश राम सिंग करणार आहेत. तर टीव्ही अभिनेता कमल नारायण राजवंशी या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मालिकेतील आर्ची आणि परश्याच्या भूमिकेसाठी अद्याप कलाकारांची नावं निश्चित झालेली नाहीत. या मुख्य भूमिकांसाठी कलाकारांचा शोध सध्या सुरू आहे. ही मालिका कधी प्रदर्शित होईल किंवा चित्रीकरणाला सुरूवात कधी होईल याच्या तारखादेखील अजून निश्चित झालेल्या नाहीत.’
सैराट चित्रपट मराठीमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे वेगवेगळ्या भाषेत रिमेक करण्यात आले. हिंदीतही  धडक चित्रपट तयार करण्यात आला. मात्र चित्रपटाचा शेवट वेगवेगळा दाखवण्यात आला. त्यामुळे आता या मालिकेत शेवट कसा असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.