धक्‍कादायक माहिती ; मसूदने रूग्णालयातुन दिला पुलवामा हल्ल्याचा आदेश

श्रीनगर : वृत्‍तसंस्था – जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आणि पठाणकोट हल्ल्याचा मुख्य सुत्रधार मसूद अजहरने पाकिस्तानच्या रावळपिंडीमधील आर्मी बेस रूग्णालयातुन पुलवामा हल्ल्याचा आदेश दिला असल्याची धक्‍कादायक माहिती आता समोर आली आहे. सुमारे चार महिन्यांपासून मसूद अजहर आर्मी बेस रूग्णालयात उपचार घेत आहे.

जिहादी संघटना यूनायटेड जिहाद काऊंसिल (यूजेसी) च्या 6 बैठकांना तो आजरपणामुळे उपस्थित राहू शकला नाही. यूजेसी ही जिहादी संघटना भारताविरोधात काम करते. पुलवामा हल्ल्याच्या आठ दिवसाआधीच दहशतवाद्यांनी हल्ल्याची पूर्ण तयारी केली होती. त्याच दरम्यान मसूदने दहशतवाद्यांसाठी खास ऑडिओ मेसेज पाठविला होता अशी धक्‍कादायक माहिती आता समोर आली आहे. गेल्या वर्षी दहशतवादी उस्मानला कंठस्नान घालण्यात आले. तो मसूद अजहरचा भाचा होता. त्याचा बदला घेण्याचे आदेश मसूदने ऑडिओ मेसेजमधून दिले होते. दहशतवाद्यांना भारताविरोधात भडकावून त्यांचा ब्रेन वॉश करण्यात आला होता.

काश्मीरच्या खोर्‍यात अद्यापही सुमारे 70 दहशतवादी दडी धरून बसले असून त्यापैकी सुमारे 35 जण पाकिस्तानी आहेत तर इतर स्थानिक असल्याचे इंटेलिजन्स ब्युरोमधील (आयबी) काश्मीरच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने सांगितले आहे. पुलवामा हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण प्राप्‍त झाले आहे.