मायावतींच्या ट्विटरपर्वाची सुरुवात, आता विरोधकांवर साधणार निशाणा

लखनऊ : वृत्तसंस्था – मायावती पुन्हा एकदा ट्विटरवर सक्रिय झाल्याचं समजत आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या सोशल मीडियापासून दूर होत्या. ट्विटरवर स्वतःचं अधिकृत अकाऊंट उघडत मायावती सोशल मीडियावर सक्रिय झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2018 मध्ये मायावतींनी हे खातं तयार केलं होतं. परंतु जानेवारी 2019 पर्यंत यावर त्यांनी कोणतंही ट्विट केलं नव्हतं असंही समजत आहे. दरम्यान बहुजन समाज पक्षाच्या काही नेत्यांनी सोशल मीडियापासून दूर राहणंच पसंत केल्याचं पाहायला मिळत आहे.

मायावतींनी 22 जानेवारीला त्यांनी पहिलं ट्विट केलं होतं. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये मायावतींनी लिहिलं आहे की, ‘नमस्कार बंधू-भगिनींनो, पूर्ण सन्मानानं मी ट्विटवर पाऊल ठेवत आहे. हे माझं पहिलं ट्विट आहे. @sushrimayawati हे माझं अधिकृत अकाऊंट असून, मी भविष्यातही या अकाऊंटवरून सक्रिय असेन.’

दरम्यान, मायावती आणि त्यांच्या पक्षाचे मोठे नेते सोशल मीडियासारख्या माध्यमावर नसणं ही खरंच एक आश्चर्यचकित करणारी घटना आहे. बीएसपीच्या नावानं अनेकदा बनावट अकाऊंट उघडली जात होती. हे निदर्शानास आल्यानंतर मात्र पक्षानं नेहमीच अशा वृत्ताचं खंडन केलं होतं.

मायावतींनी तयार केलेल्या ट्विटर अकाऊंटची खातरजमाही झाली आहे. बुधवारी त्यांच्या अकाऊंटची खातरजमा झाल्यानंतर त्या अकाऊंटवर आता ब्लू टिक आल्याचं दिसत आहे. दरम्यान मायावतींच्या ट्विटर अकाऊंटसंदर्भात बीएसपीच्या एका नेत्यानं प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. अकाऊंटची खातरजमा झाल्यानंतर मायावतींचे फॉलोअर्स वाढतच चालल्याचे दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मायावतींनी 12 ट्विट केले असून, मायावती एकाच व्यक्तीला फॉलो करतात, तर मायावतींचे फॉलोअर्स 16 हजारांच्या घरात पोहोचले आहेत.