वडिलांच्या मृतदेहाजवळ बहिण-भाऊ ४ दिवस होते बसून

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – वयोवृद्ध वडिलांचा अच्यानक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा आणि मुलगी तब्बल चार दिवास मृतदेहाजवळ बसून रडत होते. परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांनी पंटवटी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कोणताच प्रतिसाद न आल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी हि घटना उघडकीस आली. बहिण आणि भाऊ दोघेही मनोरुग्ण असल्याने त्यांनी असे केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या दोघांनीही आजुबाजूच्या कोणालाही याबाबतची माहिती न देता स्वत:ला मृतदेहाजवळ कोंडून घेतले.

अरुण विष्णुपंत पुराणिक हे कुटुंबियांसोबत शनिचौक परिसरात पुराणिक वाड्यात राहत होते. त्यांचा मुलगा व मुलगी दोघेही मनोरुग्ण असल्याने ते दोघेही घरात स्वत:ला कोंडून घेत असत. शनिवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून शनिचौक परिसरात दुर्गंधी पसरली. सुरूवातीला रहिवाशांनी मोकाट कुत्रे किंवा मांजर मृत झाली असावी असा अंदाज बांधत त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र दुर्गंधीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचा संशय बळावला. त्यांनी चौकातील पुराणिक वाड्याजवळ जाऊन खात्री करण्याचा प्रयत्न केला असता दुर्गंधी वाड्यामधून येत असल्याचे लक्षात आले.

रहिवाशांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आतून कोणीही दरवाजा उघडण्यास तयार नसल्याने पोलिसांनी धक्के देऊन तो उघडला. नाकातोंडाला रूमाल बांधून पर्फ्युमचा मारा करत पोलिसांनी घरात प्रवेश केला असता कुजलेल्या मृतदेहाजवळ दोघे भाऊ-बहिण रडत बसल्याचे आढळले. पोलिसांनी तत्काळ दोघांना घराबाहेर आणले व मृतदेहाचा पंचनामा करत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. पुराणिक यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.