अजबच ! ‘या’मुळे त्याने तोडली चक्क मर्सिडीज गाडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वाकोलाच्या कलिना परिसरात एक तरुण दारुच्या नशेत वेगाने गाडी चालवत होता. त्यानंतर त्याने एका ठिकाणी ही अलिशान मर्सिडीज गाडी थांबविली. तो त्यातून कसाबसा बाहेर आला. त्याने ही महागडी गाडी तोडायला सुरुवात केली. हा प्रकार पाहून लोकांनी पोलिसांना कळविले. पोलीस तेथे पोहचले. त्यांनी त्याला थांबविले आणि असे का करतो अशी विचारणा केली. त्याने दिलेल्या उत्तराने पोलीसही चक्रावून गेले. तो म्हणाला, ‘‘भूत माझा पाठलाग करत होते आणि ते गाडीत येऊन बसले, म्हणून मी गाडी तोडत होतो.’’

त्याने जरी असे उत्तर दिले तरी पोलिसांनी त्याचे नशेचे चढलेले भूत उतरवत त्याला अटक केली. गेल्या वर्षी जुलै महिन्यातदेखील त्याने अंबोली पोलिसांच्या हद्दीत चार गाड्यांना धडक देत दोघांना जखमी केले होते.

हेही वाचा – पुलवामा दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरा

हितेश गोलेचा (वय ४५) असे त्याचे नाव आहे. गोलेचा याचे अंधेरी पूर्व परिसरात गॅरेज आहे. मंगळवारी त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी आणलेली मर्सिडीज कार गोलेचा घेऊन निघाला होता. मुख्य म्हणजे तो दारूच्या नशेत होता. भरधाव वेगाने कार चालवत त्याने कलिना व्हिलेज परिसरातील एका गल्लीत नेली. दारूच्या नशेत असल्याने कारचे दरवाजेदेखील उघडणे त्याला शक्य होत नव्हते. तो आतच अडकला. त्यानंतर गाडी पुढे-मागे करत कसाबसा तो बाहेर आला आणि गाडीची तोडफोड करू लागला.

याची माहिती मिळाल्यावर वाकोला पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी गोलेचा याला ताब्यात घेतले.  गोलेचाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी वडील कमल यांचे निधन झाले. त्यांचे भूत सतत माझा पाठलाग करत होते. कारच्या आतही ते दिसल्यामुळेच मी गाडी तोडत होतो, असे त्याने सांगितले.

पोलिसांनी मात्र त्याच्यावर चढलेले नशेचे भूत उतरवत त्याला अटक केली. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.