…म्हणून ‘त्या’ अभिनेत्रीची बलात्काराची तक्रार मागे

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वादानंतर सुरु झालेल्या # MeToo मोहिमेच्या माध्यमातून अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं कथन मीडियावर केलं होतं. या मोहिमे अंतर्गंत बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज आणि नामवंत कलाकारांवरदेखील लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यात अभिनेत्री केट शर्माने दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावरही असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला होता. मात्र आता केटने घईंविरोधातली तक्रार मागे घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

केट शर्माने वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये सुभाष घईंविरोधात तक्रार दाखल केली होती. घई यांनी ६ ऑगस्ट रोजी मला घरी भेटण्यासाठी बोलावलं आणि तेथे असभ्य वर्तन केलं. यावेळी घई यांच्या घरी त्यांच्याव्यतिरिक्त अन्य ५ ते ६ लोक उपस्थित होते असा आरोप केटने केला होता. मात्र तक्रार दाखल केल्यानंतर कुटुंबियांना मानसिक त्रास होत असल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचं केटच  म्हणणं असल्याचं  एका वृत्तसंस्थेने  म्हटलं आहे.

तक्रार दाखल केल्यानंतर मला वारंवार पोलीस ठाण्यात जावं लागत होतं. त्यामुळे सतत होणारी चौकशी आणि या प्रक्रियांना मी कंटाळले आहे. माझ्या घरातल्यांनाही त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे’, असं केट म्हणाली.
पुढे ती असंही म्हणाली, ‘लोक फक्त # MeToo वर त्यांची मत मांडतात आणि पोलीसदेखील फक्त तक्रार दाखल करुन घेतात. मात्र तक्रार दाखल केल्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे मी तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, केट शर्माच्या आगोदर एका महिलेने सुभाष घई यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. परंतु तिने नाव गोपनीय ठेवण्याची अट ठेवली होती. सुभाष घई यांनी अनेक वेळा घरी सोडण्याच्या निमित्ताने माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला , असा आरोप या महिलेने केला होता. यानंतर सुभाष घई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मी # MeToo ला पाठिंबा देत असल्याचं म्हटलं होतं. मात्र प्रसिद्धी मिळविण्यासाठी जे या मोहिमेचा गैरफायदा घेत आहेत. त्याचं सत्य लवकरच समोर येईल.