लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपामुळे ‘या’ दिग्दर्शकाला आयएफटीडीएने केले निलंबित

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणारा दिग्दर्शक साजिद खान याला एका मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागले. होय, इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन अर्थात आयएफटीडीएने मंगळवारी रात्री साजिदला निलंबित केले. रात्री उशीरा साजिदला एका नोटीसद्वारे याबाबत सूचित करण्यात आले.

आयएफटीडीएच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. मीटूशी संबंधित प्रकरणांचा तपास करणाऱ्या आयएफटीडीएच्या आयसीसी कमिटीने साजिदला तूर्तास एक वर्षासाठी निलंबित केले आहे, असे या प्रवक्त्याने सांगितले.

साजिदवर अनेक महिलांनी गैरवर्तनाचे आरोप केले होते. अभिनेत्री सिमरन सूरी, सलोनी चोप्रा, अहाना कुमरासह अनेक महिलांनी साजिदच्या गैरवर्तनाचा पाढा वाचला होता. या आरोपानंतर साजिदची बहिण फराह खान व चुलत भाऊ फरहान अख्तर या दोघांनीही त्याच्या पाठीशी उभं राहण्यास नकार दिला. त्याने केले असेल तर त्याला भोगावेच लागेल, असे फराह म्हणाली होती. फरहान अख्तर यानेही साजिदला फटकारले होते. साजिदबद्दल मला माहित असते तर मीच सर्वप्रथम त्याचा खरा चेहरा जगापुढे आणला असता, असे त्याने म्हटले होते. केवळ इतकेच नाही तर या आरोपानंतर साजिदला ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी साजिद स्वत:ही या आरोपांवर बोलला होता.
या आरोपांमुळे माझ्या करिअरचे अतोनात नुकसान झाले आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझी बहीण आणि आईलाही यामुळे अतोनात दु:ख झाले आहे. माझ्यावर झालेले आरोप मला मान्य नाहीत. एकच बाजू ऐकून त्यावर कोणतेही मत तयार करू नका, अशी मी तुम्हाला विनंती करतो. यासाठी कोणत्याही प्रकारचे साहाय्य करायला मी तयार आहे, असे साजिदने म्हटले होते.

५ महिला पोलीसांना मारहाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला (Sr.Pi) धमकी