नगरसेवका विरुद्ध बलात्काराचा गुन्हा

औरंगाबाद – पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेत वंदे मातरमचा अपमान, सतत वादग्रस्त वक्तव्य करणे , महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ घालणे तसेच पक्षातील वरिष्ठांच्या आदेशांना डावलण्याबाबद एमआयएम पक्षातून निलंबित करण्यात आलेले नगरसेवक सय्यद मतीन याच्याविरुद्ध रशीदपुरा भागात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहित महिलेने नोकरी, आणि लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी १५ जानेवारीला फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नेमके काय होते प्रकरण ?

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी पीडित महिला आधार कार्ड काढण्यासाठी गेली असता मतीनची आणि तिची ओळख झाली. त्यानंतर मतीनने तिच्याशी जवळीक निर्माण केली. आणि तिला चांगल्या ठिकाणी नौकरीला लावून देतो. त्याचबरोबर तुझ्याशी लग्न देखील करतो असे आश्वासन दिले. त्यांनतर त्याने टाऊनहॉल परिसरात असणाऱ्या एका घरात या महिलेला बोलावून घेतले आणि तिच्यावर अत्याचार केले. घडलेला हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला जीवे मारून टाकेल. अशी धमकी देखील दिली. पीडित महिलेने लग्नाबाबद विचारपूस केली असता त्याने तिला स्पष्टपणे नकार दिला.

नकार देताच महिलेने आयुक्तालय गाठले तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक दादाराव शिनगारे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मतीनविरोधात  सिटीचौक पोलिसठाण्यात फिर्याद दाखल करण्यात अली असून पुढील तपास सुरु आहे. पीडित महिला दोन मुलांची आई असून. पतीने सोडून दिल्याने ती तिच्या आईसोबत राहते. तर काही महिन्यांपासून मतीन शहराबाहेर वास्तव्यास असल्याची चर्चा देखील होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असताना नगरसेवक मतीन बेपत्ता झाला असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.