‘त्या’ शाळकरी मुलाच्या खूनप्रकरणी १ अल्पवयीन संशयित ताब्यात

सोलापूर : पोलीसनामा आॅनलाइन – मंगळवेढ्यात प्रतिक शिवशरण याचे अपहरण करून खून करण्यात आला होता. प्रतिकची हत्या नरबळीचा प्रकार असल्याची शंकाही त्यावेळेस उपस्थित केली जात होती. या धक्कादायक निर्घृण हत्येच्या प्रकारानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. यामुळे सोलापूर पोलिसांवर मोठा दबाव आला असताना आरोपी सापडत नसल्याने संताप व्यक्त होत होता. मात्र, सध्या पोलिसांच्या तपासाला यश येत असल्याचे दिसून येत असून या हत्येप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे राहणाऱ्या प्रतीक मधुकर शिवशरण (९) या शाळकरी मुलाचे गेल्या २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. त्यानंतर सहाव्या दिवशी माचणूर गावच्या शिवारात उसाच्या फडात प्रतीकचा मृतदेह निर्घृणपणे खून करून टाकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या डोक्याचे केस पूर्ण कापलेले, डावा पाय पूर्ण तोडून गायब केलेला होता. तेथेच हिरव्या रंगाची चोळी व बांगड्याही मृतदेहाशेजारी मिळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेला अल्पवयीन मुलगा मृत प्रतीकच्याच गावातील राहणारा आहे. गुन्ह्यशी संबंधित काही संशयित वस्तू त्याच्या घरात पोलिसांनी घेतलेल्या झडतीत मिळून आल्यानंतर त्यास तपासाकामी ताब्यात घेण्यात आले आहे. प्रतीकचे अपहरण आणि खून या अल्पवयीन मुलाने केल्याबाबतचे काही साक्षीपुरावेही मिळाल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

८५ लाख शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके, सर्वाधिक झळ मराठवाड्याला 

या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन प्राथमिक तपास केल्यानंतर सोलापूरच्या बाल न्यायमंडळासमोर हजर केले असता त्याची रवानगी जिल्हा बाल अभिक्षणगृहात करण्यात आली. प्रतीकचा खून नरबळीच्या उद्देशाने झाला नाही. तसा कोणताही पुरावा समोर आला नाही, असेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र लवकरच गुन्ह्याचा हेतू समोर येईल, असे ते म्हणाले. प्रतीकचे अपहरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून मंगळवेढय़ात जनआंदोलन सुरू झाले होते. तसेच विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींची माचणूर येथे मृत प्रतीकच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रीघ लागली होती. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही माचणूर येथे भेट देऊन शिवशरण कुटुंबाचे सांत्वन केले होते. यावेळी आठवले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांवर आपला संताप व्यक्त केला होता. तसेच याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे म्हटले होते.

यामुळे पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील मंगळवेढय़ाचे पोलीस उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, गिरी गोसावी, अरुण सावंत आदींच्या पथकाने या गुन्ह्याचे धागेदोरे उलगडत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.