आमदार कर्डिले यांनी मैत्रीचा गैरफायदा घेतला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – आमदार शिवाजी कर्डिले यांनी माझ्यासोबत असलेल्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना माझ्या घरी आणले. राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा देण्याच्या निर्णयात माझा सहभाग नसताना केवळ माझ्या विरोधात षडयंत्र रचण्यासाठी त्यांना घरी आणले, असा आरोप माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.

ते म्हणाले की, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिलेल्या निर्णयाच्या कुठल्याही बैठकीत मी उपस्थित नव्हतो. त्या निर्णयाशी माझा कसलाही संबंध नाही. तरीही पक्षांतर्गत विरोधकांकडून मला त्यात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझी पक्षश्रेष्ठींसमोर बदनामी करण्याचे षडयंत्र पक्षातूनच सुरू आहे. जे माझ्यावर आरोप करतात, त्यांनी विशाल गणपतीसमोर हात ठेवून आरोप करून दाखवावे, असे आव्हानही कळमकर यांनी केले.

महापालिकेत भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॅमेज झालेला आहे. हा निर्णय फक्त जगताप पिता-पुत्रांचा आहे. त्या निर्णयाशी माझा कुठलाही संबंध नाही. तरीही पक्षातील विरोधक श्रेष्ठींसमोर माझी बदनामी करीत आहेत. कुठलाही पाहुणा आल्यास त्याचे आपण स्वागत करतो. ही आपली संस्कृती आहे. त्यानुसार मंत्री महाजन हे माझ्या घरी आल्यानंतर मी त्यांचे स्वागत केले. परंतु हे फोटो सोशल मीडियात व्हायरल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आमदार कर्डिले यांनी केला आहे, असेही कळमकर म्हणाले.