चालढकल करणाऱ्या प्रशासकीय अधिका-यांना आमदार लांडगे यांनी घेतले फैलावर

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – कामाचा डोंगर पुढे असताना कामात होणारा हलगर्जीपणा आणि त्यामुळे शहरातील कामांना होणारी दिरंगाई यामुळे आमदार महेश लांडगे यांनी महापालिका व अन्य विभागांच्या अधिका-यांना फैलावर घेतले. दिवस भरण्यासाठी काम न करता प्रामाणिकपणे काम करण्याची मानसिकता ठेवा. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होत आहे, असे खडेबोल आमदार लांडगे यांनी अधिका-यांना लगावले.

भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांची महापालिका आयुक्त आणि विविध विभागाचे अधिकारी यांच्यासोबत पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात बैठक झाली. या बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्याशी निगडित अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मागील काही महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्या गावांच्या गायरान आणि शासकीय जागांचे भूसंपादन, हस्तांतरण ब-याच प्रमाणात अद्यापही रखडलेले आहे. एमआयडीसीमधील विविध कामे रखडली असून समस्या वाढत आहेत, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

आमदार महेश लांडगे बैठकीत बोलताना म्हणाले, “यशवंतनगर चौकापासून पथिक हॉटेल समोरून ते स्पाईन रोड पर्यंतचा रस्ता विकसित करून या रस्त्यावर असणा-या एमआयडीसी च्या पाण्याच्या लाईन हलविण्याबाबत एमआयडीसी कडून अजूनही मान्यता मिळलेली नाही. प्रभाग क्रमांक आठ मधील गवळी माथा चौक ते स्पाईन रोड पर्यंतचा रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे बाकी आहे. याच प्रभागातील इंद्रायणीनगर चौकापासून डायनोमेक कंपनी पर्यंतचा रस्ता अजून विकसित झालेला नाही. या रस्त्यावर असणा-या अतिक्रमणाचे सीमांकन देखील एमआयडीसी कडून झालेले नाही.

एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्माण होते. या परिसरातून दोन नाले भरून वाहत आहेत. हे नाले पुढे जाऊन पवना नदीला मिळत असल्याने पवना नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे एमआयडीसी परिसरात सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी एमआयडीसी प्रशासन वेगवेगळी कारणे देत चालढकल करत आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांनी एमआयडीसी च्या प्रशासकीय अधिका-यांना चांगलेच सुनावले. तसेच एमआयडीसी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांचा समन्वय साधून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आदेश देखील आमदारांनी यावेळी दिले.

महापालिका कार्यक्षेत्रात समाविष्ट झालेल्या गावांमधील गायरान व शासकीय जमिनींचे भूसंपादन व हस्तांतरण करून त्यावर महापालिकेकडून विकासकामे करणे गरजेचे आहे. मात्र अद्याप काही जागांचे संपादन व हस्तांतरणच झालेले नाही. काही जागांची प्रकरणे राज्य शासनाकडे तर काहींची जिल्हाधिकारी कार्यालयांकडे अडकून आहेत. त्यासाठी योग्य तो पाठपुरावा करावा, असेही आमदार लांडगे म्हणाले.

एफ दोन ब्लॉक मध्ये फायर स्टेशन उभारण्यासाठी महापालिकेकडून एमआयडीसीकडे बांधकाम परवानगी साठी अर्ज केला आहे. मात्र एमआयडीसी कडून पैशांची मागणी करण्यात येत असल्याने ते काम रखडले आहे. त्याबाबत त्या जागेचे विकसन करण्यासाठी मुदतवाढ मिळण्यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रादेशिक अधिका-यांकडे पत्र पाठविले आहे. त्याबाबतचा अहवाल महापालिका प्रशासन येत्या आठवडाभरात देणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच विविध प्रश्नांवर विविध विभागांशी समन्वय साधून प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.