राजकीय

‘मतविभाजन टाळण्यासाठी मनसेने एकत्र यावं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी निवडणुकीत मत विभाजन टाळण्यासाठी मनसेने एकत्र यायला हवं असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. इतकेच नाही तर, एखाद-दुसऱ्या जागेसाठी ताणून धरु नये, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. याशिवाय राजू शेट्टींचे गैरसमज दूर करु असंही त्यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “लोकसभेत भाजप-शिवसेनेचा पराभव करायचा असेल तर धर्मनिरपेक्ष विचारधारा ठेवून एकत्र आलं पाहिजे. मनसेनेही मागील वेळी एक लाख मतं घेतली होती. त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की, मागच्या गोष्टी मागे सारुन मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले.

पार्थबाबत पक्षाने स्पष्ट केलेलं नाही
दरम्यान, मावळ मतदारसंघातून पार्थ पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. याबाबतही अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “आजकाल मुलं त्यांचा निर्णय स्वत: घेतात. पार्थबाबत पक्षाने अद्याप काहीही स्पष्ट केलेलं नाही. निवडणुकीच्या प्रचाराला फिरायला लागला म्हणजे निवडणूक लढवणार असं होत नाही.”

शिवसेना-भाजप युती होणार
शिवसेना-भाजप युतीबाबत त्यांचं मत जाणून घेण्यासाठी अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, “शिवसेना आणि भाजप युती होणार हे नक्की. हे दबावाचं राजकारण आहे. बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी चर्चांचं सत्र सुरु आहे. ते हा मुद्दा ताणतील पण तुटू देणार नाहीत,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या