पोलिसांना मारहाण करणारी ‘ती’ मॉडेल अटकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लेखी अर्जावर कारवाई केली नाही म्हणून पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपायाला धक्काबुक्की करणाऱ्या रेश्मा मलिक या मॉडेलला अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. दिंडोशी पोलिसांनी तिच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. मात्र ती फरार झाली होती.
व्यावसायाने मॉडेल असलेली रेश्मा दोन महिन्यांपूर्वी एका कामानिमित्त दिंडोशी पोलीस ठाण्यात आली होती. त्यावेळी तिच्यात आणि एका महिला पोलीसामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती त्यावेळी रेश्माने महिला शिपायाला धक्काबुक्की केली होती.  पोलीस शिपायाला केलेल्या धक्काबुक्की प्रकरणी तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादंवि ३५३ नुसार गुन्हा नोंदविताच तिने दिल्लीत पळ काढला होता.
अशी केली अटक –
पोलीस रेश्माच्या गोरेगाव येथील प्लॅटवर गेले असता त्याला टाळे आढळले. रेश्मा दिल्लीत असल्याची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी दिल्लीतील पार्लमेंट पोलीस ठाण्याच्या मदतीने अशोक रोडवरील साहिब गुरुद्वारा, बॅग्स या बंगल्यातून रेश्माला सोमवारी अटक केली. तिला आधी ओशिवरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्यानंतर दिंडोशी पोलिसांनी तिला अटक केली.
दुसऱ्या गुन्ह्यातही दोषी –
दरम्यान, याच मॉडेलने आंबोली पोलीस ठाण्यातही  पोलिसांना शिवीगाळ करीत पोलीस ठाण्यातील पाच महिला पोलिसांना धक्काबुक्की केली होती. या कारणास्तव आणखी एका गुन्ह्यातही तिच्या  चौकशीसाठी न्यायालयाने पोलिसांना गुरुवारी परवानगी दिली. न्यायालयात नेले असता दुसऱ्या गुन्ह्यातही तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने तिची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी दिंडोशी पोलिसांनी कारागृहातून तिचा ताबा घेतला.  त्यामुळे मॉडेल रेश्मा मलिक सध्या भायखाळा कारागृहात आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी दिंडोशी पोलीस करीत आहेत.