८५ टक्के होणारी लूट आम्ही 100 टक्के थांबवली : पंतप्रधान

वाराणसी : वृत्तसंस्था – काँग्रेसने देशाची जी व्यवस्था निर्माण केली, त्यात इतकी वर्षे लूट सुरु होती. सर्वसामान्य लोकही कर प्रामाणिकपणे भरत होते. त्यात ८५ टक्के लूट होत होती, तेव्हा इतक्या वर्षात काँग्रेसने याकडे दुर्लक्ष केले. मात्र आम्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने ही ८५ टक्के होणारी ही लूट १०० टक्के थांबवली आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते वाराणसीतील प्रवासी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  

बनारस हे शहर प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती, परंपरा, विद्वत्तेचं दर्शन जगाला देत आहे. मागील साडेचार वर्षांत भारताने जगात आपलं स्थान मिळवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. भारत बदलणार नाही, हा लोकांचा विचारच आम्ही बदलवला आहे. जग आज भारताला स्वीकारत आहे, भारताने दिलेले सल्ले गृहीत धरत आहे. भारताच्या विचारांना स्वीकारत आहेत, असं मोदींनी यावेळी म्हटलं.

तसंच आमच्या सरकारने गेल्या साडेचार वर्षांमध्ये ५ लाख ७८ हजार कोटी रुपये म्हणजे सुमारे ८० अब्ज डॉलर्स विविध योजनांमार्फत थेट लोकांना दिले आहेत. त्यांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. या ५ लाख ७८ हजार कोटी रुपयांपैकी ४ लाख ९१ हजार कोटी रुपये काँग्रेसच्या सत्ताकाळात गहाळहोत होते. आमच्या सरकारने व्यवस्थेत बदल केले नसते तर हे पैसैही तसेच लुटले गेले असते. हे काम आधीच्या सरकारलाही करता आलं असतं पण त्यांची नियत नव्हती आणि इच्छाशक्तीही नव्हती, असा घणाघात मोदींनी यावेळी केला.