पंतप्रधानांच्या दौऱ्यावर ‘गो बॅक मोदी’ ची पोस्टर

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधकांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असताना भाजपने मात्र सर्व कार्यक्रम सुरु ठेवले असून आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींही एका दिवसानंतर जाहीर सभा सुरु केल्या आहेत. ते शनिवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्या पार्श्वभूमीवर पांढरकवडा येथे मोदी गो बॅक अशी पोस्टर झळकत असल्याचे आढळून आली आहेत. ही पोस्टर काँग्रेसने लावल्याचे बोलले जात आहे. २०१४ मधील निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी या मतदारसंघात आले होते. तेथे त्यांनी चाय पे चर्चा हा कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने ही पोस्टर लावली असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते विदर्भ आणि खान्देशात विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते एकलव्य मॉडेल स्कूलचे उद्घाटन होणार आहे. तसेच प्रधानमंत्री गृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या प्रदान करण्यात येतील. अजनी (नागपूर) ते पुणे रेल्वेचा ई-शुभारंभ, ग्रामोन्नती योजनेतील लाभार्थींना धनादेशाचे वाटप होणार आहे. त्यानंतर ते बचतगटांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत.

त्यानंतर ते धुळ्याकडे रवाना होतील. लोअर पांझरा मध्यम प्रकल्पाचे उद्घाटन, सुळवडे-जांफळ उपसा सिंचन योजना, धुळे शहराच्या पाणीपुरवठा योजना, धुळे-नारदा रेल्वे व जळगाव-मनमाड या रेल्वारील तिसऱ्या लाईनचे भूमीपूजन होणार आहे.