रोहित आणि पार्थ यांच्या उमेदवारीच्या चर्चेने मोहिते पाटील गट नाराज 

माढा : पोलिसनामा ऑनलाईन – माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बाले किल्ला होऊ पाहत आहे. माढा मतदार संघातील सत्ता समीकरण राष्ट्रवादीच्या बाजूनेच जाते त्याचे कारण एकच कि या भागात साखर कारखान्यांचे असणारे जाळे आणि त्यावर राष्ट्रवादीची असणारी मजबूत पकड या जोरावर राष्ट्रवादीचा माढा बाले किल्ला बनवत आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे या मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची तयारी करत असताना एक बातमी त्यांच्या सहित त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावून गेली असणार ती म्हणजे बारामतीच्या पवार कुंटुंबातील पार्थ आणि रोहित या मतदार संघातून उमेदवार म्हणून उभे केली जाण्याची शक्यता आगामी काळात आहे.

माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी हि या मतदार संघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यासाठी चंग बांधला आहे. अशातच त्यांचा हि हिरमुड करण्याचा मनसुबा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात आहे. त्याच प्रमाणे या मतदार संघाचे विद्यमान खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांच्या नावावर हि ऐन वेळी खाट मारून उमेदवारी पवार कुटुंबातील व्यक्तीला दिली जाईल असे बोलले जाते आहे.

या मतदार संघात विजयसिंह मोहिते पाटील यांचा चांगलाच संपर्क आहे. त्यांच्या संपर्काच्या माध्यमातून त्यांनी या भागात अनेक नेते घडवले आहेत. तर विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे अशात त्यांची उमेदवारी पक्षाने नाकारल्यास त्यांच्या मनात त्याबद्दल नाराजी निर्माण होणे सहाजिक गोष्ट आहे. तसेच त्यांची उमेदवारी पक्षाने नाकारल्यास त्यांचे पुनर्वसन कुठे करायचे हा मोठा प्रश्न पक्षापुढे राहणार आहे त्यांना विधानपरिषदेवर पाठवून त्यांची बोळवण करण्याची योजना सध्या राष्ट्रवादीच्या गोटात असण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी  माढा मतदार संघाचे २००९ ते २०१४ या काळात  प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी मोदी लाटेत विजय सिंह मोहिते पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यात जोरदार लढत झाली होती. या लढतीत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच मताधिक्य कमालीचे घटवले होते. अशातच सातारा जिल्ह्यातील लोकांनी राष्ट्रवादीला एकहाती मतदान दिल्याने राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील विजयी झाले होते. पार्थ पवार अथवा  रोहित पवार यांना उमेदवारी देऊन माढा मतदार संघातून निवडून आणले जाईल का हे येत्या काळात बघण्यासारखे राहणार आहे. तूर्तत तरी मोहिते पाटील गटात कमालीची शांतता पाहण्यास मिळते आहे.

राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नगरसेवकांची होणार हकालपट्टी ?