डॉ. भामरे आणि आ. गोटे यांच्यात रंगला कलगीतुरा

धुळे : पोलीसनामा पोलीसनामा – काही दिवसांपूर्वी पक्षाच्या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत आ. अनिल गोटे यांनी नाराजी व्यक्त करत कार्यक्रमस्थळ सोडून ते निघून गेले होते. त्यानंतर गोटे आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यातील वाद वाढत चालला आहे. दोघांनीही पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केल्याने त्यांच्यात महापालिकेच्या निवडणुकीवरून भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. पक्षात गुंडांना प्रवेश मिळत असल्याचा आरोप करणाऱ्या आ. गोटेंना २०१४ मध्ये विधानसभेची उमेदवारी देऊन पावन करून घेण्यात आले होते. तेव्हा तेलगी राष्ट्रसंत होता का? असा सवाल करीत भाजपात पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, अशा शब्दात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी म्हटले आहे.

डॉ. भामरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, इंदूर – मनमाड रेल्वे प्रकल्प मंजूर करुन आणल्यापासून आ.अनिल गोटेंचा जळफळाट होत आहे. ते कमरेखालची भाषा वापरत आहेत. राजकारणात विरोध असावा, पण अशी विकृत प्रवृत्ती नको. २०१४ मध्ये सर्व्हेमध्ये मला मेरीटवर तिकीट मिळाल्याने काही महाभागांना ते सहन झाले नाही. तेव्हापासून गोटे माझ्यावर आगपाखड करीत आहेत. मला तिकीट जातीच्या आधारावर मिळाल्याचे सांगणाऱ्यांना भाजपाने २०१४ मध्ये विधानसभेचे तिकीट दिले, तेव्हा पक्षाने त्यांची जात बघितली होती का? अक्कलपाड्याबाबत आ. गोटे हे काँग्रेसचे तुणतुणे वाजवितात. त्यांनी काँग्रेसची सुपारी घेतली आहे का? असा सवाल डॉ.भामरे यांनी उपस्थित केला.

दुसरीकडे आ. अनिल गोटे यांनीही पत्रकार परिषद घेऊन डॉ. भामरे यांचा समाचार घेतला आहे. आ. गोटे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, शहराच्या विकासासाठी मी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. हिंमत असेल तर डॉ. सुभाष भामरेंनी राजीनामा देऊन समोरासमोर निवडणूक लढवावी. मी कमरेखालची भाषा वापरत असल्याचा आरोप करणाऱ्यांनी मला पक्षशिस्त आणि निष्ठा शिकवू नये. गुंड-पुंडांना पक्षात घेऊन पावन करणाऱ्यांकडे पक्षनिष्ठा आहे का? आपले उमेदवार फोडण्यासाठी ३० लाखांचे आमिष दाखविले जात आहे. पक्ष वाढीला माझा विरोध नाही. मात्र, पक्षात प्रवेश घेत असलेल्या भ्रष्ट आणि गुंड-पुंडांना कायम विरोध आहे. पक्ष वाढत नसून केवळ सूज येत आहे. पक्षाच्या वाईट काळात ज्यांनी पक्षाचे काम केले त्या निष्ठावानांवरचा अन्याय मी सहन करु शकत नाही. केवळ सत्तेसाठी पक्षाकडे गर्दी करणाऱ्यांना मी निष्ठावान म्हणू शकत नाही.

…म्हणून त्या महिलेने केली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची धुलाई