बहुचर्चित ठाकरे चित्रपटाचा दमदार ट्रेलर लॉन्च

मुंबई : वृत्तसंस्था – बहुचर्चित असलेल्या ‘ठाकरे’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेला हा चित्रपट आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने चित्रपटामध्ये बाळासाहेबांची हुबेहुब भूमिका साकारली असल्याचे ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे. या ट्रेलरने बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. शिवसैनिकांसह देशभरातील बाळासाहेबांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते अशात आता ट्रेलर रिलीज झाला आहे.

या चित्रपटाचं  दिग्दर्शन अभिजीत पानसे करत असून  25 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने मराठीतील बाळासाहेबांच्या आवाजासाठी सचिन खेडेकर यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे राज्यसभा  खासदार संजय राऊत ‘ठाकरे’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

विशेष बाब अशी की, या चित्रपटाची पटकथा  संजय राऊत यांनी लिहिली आहे. ही पटकथा लिहिण्यासाठी त्यांना तब्बल  चार वर्षे लागली आहेत. या चित्रपटाच्या सिक्वलचाही विचार सुरू असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं असल्याचं समजत आहे.  ‘बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास एका चित्रपटात दाखवू शकत नाही. त्यामुळे या बायोपिकच्या सिक्वलचाही विचार केला असून त्याच्यावरही काम सुरू केलं आहे,’ असं ते म्हणाले होते.

चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात
ठाकरे सिनेमातील तीन दृश्य आणि काही संवादांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपानंतरही आज चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड आणि शिवसेना समोरासमोर आल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

काय आहे ट्रेलरमध्ये ?
बाळासाहेब ठाकरे यांच्या डोक्यात स्वतंत्र संघटनेचा आलेला विचार आणि त्यानंतरचा शिवसेनेचा झंझावाती प्रवास, बाळासाहेबांचं ज्वलंत हिंदुत्व, मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी, मुंबईत दंगल उसळली असताना त्यांनी दिलेला ‘आवाज’, कामगारांना दिलेला आधार, बाबरी प्रकरणात त्यांनी दिलेली साक्ष, त्यांना सावलीसारखी साथ देणाऱ्या मांसाहेब, जावेद मियांदादला लगावलेला ‘षटकार’ हे सगळे प्रसंग या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत.