आईच्या प्रियकराकडून चिमुरड्याला अमानुष मारहाण ; चिमुरड्याचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका विवाहित महिलेच्या प्रियकराने महिलेच्या पाच वर्षीय चिमुकल्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई घरात नसल्यामुळे हा चिमुकला रडत होता. त्यामुळे आईच्या प्रियकराने त्याला इतकी मारहाण केली की यात चिमुकल्याचा मृत्यू झाला. युआन सुर्यप्रताप सिंह असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. विशेष म्हणजे मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर हे प्रकरण दडपण्यासाठी हा तरुण युआन ला दवाखान्यात घेऊन गेला इतकेच नाही तर लाडू खाल्ल्यामुळे त्याची तब्बेत बिघडली असा बनाव देखील केला. मात्र पोस्टमोर्टम केल्यानंतर खरी गोष्ट पुढे आली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, युआनची आई राणी सिंह आणि वडील सुर्यप्रताप सिंह यांचे २०१२ साली लग्न झाले होते. त्यानंतर २०१३ साली युआनचा जन्म झाला युआनची आई एका शाळेत शिक्षिकेचे काम करीत होती. तिथेच तिचे आणि शाळेतीलच कर्माचारी नरेंद्र याचे प्रेम संबंध जूळले. त्यामुळे पती सुर्यप्रताप सिंह यांच्याशी तिचे पटेना शेवटी नरेंद्र आणि मुलगा युआनला घेऊन ती दुसरीडे राहू लागली. याच काळात राणीची नोकरीही गेली.

त्यामुळे राणी युआनला घरी ठेऊन नोकरीच्या शोधात फिरत होती. नरेंद्र युआनला घरी सांभाळत असे त्याचसोबत तो त्याचा अभ्यासदेखील घ्यायचा. मात्र १० जानेवारी रोजी आई घरी नव्हती आणि अभ्यासादरम्यान युआनकडून काहीतरी चूक झाल्याने तो रडू लागला. नरेंद्रला युआनच्या रडण्याचा राग अनावर झाला. त्याने युआनला निर्दयपणे बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

युआनचा मृत्यू झाल्याने घाबरलेल्या नरेंद्रने लाडू खाल्ल्याने युआनची प्रकृती बिघडल्याचा बनाव केला. मात्र शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी युआनचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी संशयावरून नरेंद्रला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला आहे.