ऑनलाइन फार्मसीच्या विरोधात केमिस्ट संघटनेचे 8 जानेवारीला “हल्लाबोल आंदोलन”

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऑनलाइन फार्मसीच्या विरोधात केमिस्ट संघटनेचे 8 जानेवारीला “हल्लाबोल आंदोलन” होणाऱ्या औषधे विक्री्च्या विरोधात संपूर्ण भारतातील औषधे विक्रेत्यांच्या वतीने उद्या म्हणजेच ८ जानेवारी २०१९ रोजी “हल्लाबोल” आंदोलन करण्यात येणार आहे. ‘अखिल भारतीय औषधे विक्रेता संघटने’च्या (AIOCID) वतीने हे हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. अखिल भारतीय औषधे विक्री संघटनेचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुशील शहा व सचिव अनिल बेलकर यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
ऑनलाइन औषधी ही समाजाच्या हिताची नसून त्यामुळे अनेक प्रकारचे दुरुपयोग होत असल्या कारणाने सर्व औषधे विक्रेते हे आंदोलन पुकारणार आहेत. मुक मोर्चाच्या स्वरूपात हे आंदोलन असणार आहे. उद्या हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासनास या मोर्चाद्वारे ऑनलाइन औषध विक्री विरोधात निवेदन देण्यात येणार आहे.
याबाबत बोलताना सुशील शहा म्हणाले की, “ऑनलाइन औषधीसाठी केंद्र सरकार अनुमानीत प्रस्तावित मसुदा घेऊन येत आहे. त्याविरोधात ‘अखिल भारतीय औषध विक्रेता संघटने’चे (AIOCID) अनेक आंदोलने आतापर्यंत झाली आहेत. यामध्ये भारत बंद, औषधी विक्रेता मुक मोर्चा, ठिय्या आंदोलनसुद्धा करण्यात आले आहे. परंतु याबाबत अजूनही सरकार गंभीर असल्याचे दिसत नाही असे समोर आले आहे.”
इतकेच नाही तर, ‘चेन्नई हायकोर्ट व दिल्ली हायकोर्टाने ऑनलाइन औषधविक्री बंद करावी असा आदेश दिला होता, परंतु सरकार गांभीर्याने विचार करत नाही. प्रस्तावित अधिसूचनेचा मसूदा यामध्ये संघटनेचे मतदेखील जाणून घ्यावे जेणेकरून समाज हिताकडे दुर्लक्ष होणार नाही’ असेही शहा म्हणाले.
याशिवाय, ‘अखिल भारतीय औषध विक्री संघटनेचे’ जिल्हा संघटनेचे सचिव अनिल बेलकर याबाबत बोलताना म्हणाले की, “व्यवसायापेक्षा समाजहित जास्त महत्त्वाचे असून आम्हीदेखील या समाजाचे एक घटक आहोत. ऑनलाइन औषधीमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन देऊन कळविले आहे. इतकेच नाही तर प्रेसच्या माध्यमातूनही जनसामान्यांना माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत प्रस्तावित अधिसूचनेचा मसूदा रद्द करण्यासाठी भारतभर औषध विक्रेते उद्या 8 जानेवारी 2019 रोजी हल्लाबोल आंदोलन करणार आहोत.”

मुख्य म्हणजे, ‘या आंदोलनात पुणे जिल्हासुद्धा सहभागी होत असून जिल्ह्यातील अंदाजे 7500 औषध विक्रेते या मुक मोर्चात सहभागी होणार असून जिल्हाधिकारी व अन्न तसेच औषध प्रशासनास निवेदन सादर करणार आहोत’ असेही बेलकर म्हणाले.