नारायण राणेंमध्ये लोकसभा लढण्याची हिंमत नाही : खा. विनायक राऊत

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – हिंमत असेल तर स्वत: नारायण राणे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे थेट आव्हान शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना दिले आहे. वाटद येथे झालेल्या जाहीर मेळाव्यातून त्यांनी हे आव्हान दिले. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत, उद्योजक अण्णा सामंत, किरण सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, जिल्हा महिला आघाडीच्या शिल्पा सुर्वे आदी पदाधिकारी व महिला संघटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खासदार विनायक राऊत आपल्या भाषणात म्हणाले की, कोण दीडफुट्या आला, त्याला उत्तर देण्यासाठी आजची आमची सभा नाही. चिलटे खूप येतील, पण तुम्ही बिथरू नका. ज्या शिवसेनेने नारायण राणेंचा उद्धार केला, तीच शिवसेना त्याची अधोगती करेल. हिंमत असेल, तर येत्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी स्वत: शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान राऊत यांनी यावेळी राणे यांना दिले. आणखी खुमखुमी असेल, तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी. ५ ते १० हजार मताच्या पुढे हा माणूस जाऊ शकणार नाही, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी केली.

सिंधुदुर्गातल्या नारायण राणेंच्या १० वर्षातील राजकारणात त्या ९ जणांचे बळी नेमके कोणी घेतले, हिंमत असेल तर नारायण राणे उत्तर द्या, असे आव्हानही खासदार विनायक राऊत यांनी वाटद जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्यात दिले. चालत्या बोलत्या संसारातून एखाद्याचं डोकं फोडून टाकायचे. चेंदामेंदा करायचा आणि हसरं संसार उद्ध्वस्त करायचा, याची उत्तरे कोण देणार? असा सवालदेखील विनायक राऊत यांनी यावेळी राणेंना केला. ६ जानेवारीला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने याच मैदानात सभा घेत, खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत यांच्यावर टीका केली होती, याच टीकेला उत्तर देण्यासाठी वाटद जिल्हा परिषद गटाचा शिवसेनेने मेळावा आयोजित केला होता. यामध्ये नारायण राणे यांच्यावर खासदार विनायक राऊत यांनी गंभीर आरोप करत जोरदार टीका केली.