मुकुंदनगर दंगल : नगरसेवकासह पाच जणांना अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जुन्या वादातून मुकुंदनगरमध्ये दंगल घडविल्याप्रकरणी कँप पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक समद खान (रा. मुकुंदनगर), माजी नगरसेवक मुजाहिद ऊर्फ भा बाबुलाल कुरेशी (रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट), अजहर आयुब शेख, हारून सय्यद अब्दुल रहेमान, शादाब युसुफ खान (सर्व रा. मुकुंदनगर) अशा पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दंगलीनंतर बारा तासांच्या आत महत्त्वाची आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील मुजाहिद कुरेशी याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात आणखी एक खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. मागील आठवड्यात घडलेल्या या घटनेने झेंडीगेट परिसरात तणाव निर्माण झाला होता.

जुन्या वादातून मुकुंदनगर मध्ये बाबा खान व समद खान यांच्या गटात तुफान हाणामारी झाली. तसेच मौलाना आझाद शाळेसमोरील परिसरात दुकाने व घरांवर जोरदार दगडफेक करून दहशत निर्माण करण्यात आली होती. त्यामुळे मुकुंदनगर परिसरात पहाटेपर्यंत तणावसदृश परिस्थिती होती. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. या हाणामारीत एकाची प्रकृती गंभीर असून कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नासह दंगलीचे विविध कलमान्वये तब्बल पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक समद खान, माजी नगरसेवक मुजाहिद कुरेशी यांच्यासह एकूण पाच जणांना पुणे येथून पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश फडतरे, रोहन खंडागळे, गणेश इंगळे, कर्मचारी योगेश गोसावी, बाळासाहेब मुळीक, मन्सूर सय्यद, दिगंबर कारखेले, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, मल्लिकार्जुन बनकर, रवींद्र कर्डिले, संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

याप्रकरणी जखमी जुनेद याच्यावर सिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुकुंदनगर येथील दंगलीप्रकरणी पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरु केली आहे. या दंगलीमुळे मुकुंदनगर परिसरात पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस उपधीक्षक प्रांजल सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आदींनी गुरुवारी रात्री उशिरापर्षंत मुकुंदनगर येथे थांबून दंगल नियंत्रणात आणली.