स्वत:च्या बचावासाठी ‘या’ बड्या नेत्याने केली मोदींची प्रशंसा

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – १६ व्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज (दि.१४) ज्येष्ठ समाजवादी नेते मुलायमसिंह यादव यांनी लोकसभेत मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाल्याचे दिसून आले. राज्‍यसभेचे खासदार अमर सिंह यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेक विरोधकांच्या मागे लागलेल्या विविध प्रकरणांच्या चौकशीच्या फेऱ्यांच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचारातून बचावासाठी मुलायम सिंह यादव यांनी मोदींची प्रशंसा केली आहे असे वक्तव्य अमर सिंह यांनी केले आहे.

यावेळी बोलताना अमर सिंह म्‍हणाले की, “मुलायमसिंह यांनी मनापासून हे विधान केले की नाही, याचा विचार होणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या विधानाने गोंधळ निर्माण झाला आहे. मला वाटते की, ज्या चंद्रकला आणि रामा रामन यांनी मुलायम सिंह यादव आणि मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली नोएडा शहर लुटले, या भ्रष्टाचारातून बचावासाठी मुलायम सिंह यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. आपल्या मागे सीबीआय किंवा ईडीच्या चौकशीचा फेरा लागू नये, त्यामुळे मोदींची प्रशंसा केल्याने किमान ते तटस्थ तरी राहतील असे त्यांना वाटले असेल.”

दरम्यान समाजवादीचे नेते आझम खान यांनीही मुलायम सिंह यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मुलायम यांच्या वक्तव्याने मला खुपच दुःख झाले. हे विधान त्यांच्या तोंडी टाकण्यात आले आहे. हे विधान मुलायम सिंह यांचे नाही तर नेताजींना ते देणे भाग पाडले आहे.”