सलमान खानच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन- अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना फोनवरून ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उत्तरप्रदेशातील गुंड शाहरुख गुलाबनबी उर्फ शेरा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मी छोटा शकीलचा माणूस आहे सलमान खानचा नंबर द्या नाहीतर ठार करेन, अशी धमकी शाहरुख उर्फ शेराने दिली होती. त्याला अटक करण्यात आली असून कोर्टात हजर केले असता त्यास २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हिंदी सिनेमाचे लेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना सलमान खानचा नंबर मागण्यासाठी शेरा या गुंडाने मोबाइलवर फोन केला. मात्र, सलमानच्या जिवाला धोका असल्याने सलीम खान यांनी नंबर देण्यास नकार दिला. पहिला फोन १३ नोव्हेंबरला आला होता. सलीम खान यांनी या फोनकडे प्रथम दुर्लक्ष केले. परंतु, त्यानंतर पुन्हा १५ नोव्हेंबरला शेरा या गुंडाने सलीम खान यांना फोन करून सलमान खानचा नंबर दिला नाही तर ठार करण्याची धमकी दिली होती. आपण छोटा शकीलचा हस्तक असल्याचेही तो म्हणाला होता. सलीम खान यांनी त्यावेळीही दखल न घेतल्याने शेरा वारंवार फोन करू लागला होता. फोनच्या कॉलर आयडीवर डीजीपी असे लिहिले होते. यासंदर्भात सलीम खान यांनी सलमानचा बॉडीगार्ड शेरा यालाही संदर्भात सांगितले. त्यावेळी शेरा या सलमानच्या बॉडीगार्डने त्यालाही फोन येत असल्याचे सलीम खान यांना सांगितले.

यानंतर सलीम खान यांनी त्यांचा मॅनेजर विकास हेमेंद्रकुमार छाया यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन तक्रार केली. मोबाईल नंबरवरून माहिती काढल्यानंतर शेरा नावाच्या माणसाचा हा मोबाइल असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी या मोबाइल क्रमांकाचा माग काढून शेरा उर्फ शाहरुख नबीला अटक केली. उत्तर प्रदेशात शेरा या गुंडावर हत्येचा प्रयत्न, खंडणी, प्राणघातक हत्यारं वापरणं असे साठहून अधिक गुन्हे दाखल आहे. त्याचा टायर विक्रीचा व्यवसाय आहे. शेरा या गुंडाने सलीम खान यांना दहापेक्षा जास्त वेळा फोन केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला अटक करून कोर्टात हजर केले. न्यायालयाने त्याला २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.