वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया बुकचे मुंबईच्या खड्ड्यांना ‘गोल्ड मेडल’

मुंबई: पोलीसनामा आॅनलाईन – मुंबईविषयी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील खड्ड्यांना वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया बुकचे ‘गोल्ड मेडल’ मिळाले असून याबाबतचे प्रमाणपत्र, सुवर्ण पदक व गोल्डन फ्रेम ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक’ कडून प्राप्त झाले आहे. मुंबईतील खड्ड्यांनी मुंबईकर त्रस्त झाले असले तरी या खड्ड्यांना एक अनोखा बहुमान प्राप्त झाला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र गिनिज रेकॉर्ड बुक आणि लिम्का रेकॉर्ड बुकने ही नोंद करण्यास नकार दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील रिपाइं (ए) रोजगार आघाडी महाराष्ट्र सरचिटणीस नवीन लादे यांनी सुरू केलेल्या ‘मुंबईचे खड्डे वर्ल्ड बुकांमध्ये’ या अभियानाची नोंद वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया बुकमध्ये झाली आहे.
 लादे यांनी  मुंबईकरांना खड्ड्यांची छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन  केले होते. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास सहन करावा लागतो. अनेक मोठमोठे अपघात होतात. आणि म्हणूनच  अपघात आणि समस्या यावर उपाय म्हणून लादे यांनी मुंबईतील खड्ड्यांची आकडेवारी मोजण्यासाठी मुंबईकरांना खड्ड्यांची छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन 17 जुलै 2018 रोजी केले होते.
हेच आव्हान स्विकारत  अनेक मुंबईकरांनी जागोजागी असणाऱ्या खड्ड्यांची छायाचित्रे mumbaipotholes.com या संकेतस्थळावर पाठवली. धक्कादायक म्हणजे या खड्ड्यांची छायाचित्रांमुळे मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची आकडेवारी 38 दिवसांत समोर आली आहे. इतकंच नाही तर महत्त्वाची बाब अशी की,  आता या खड्ड्यांच्या आकडेवारीची वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये नोंद झाली आहे. mumbaipotholes.com या संकेतस्थळावर खड्ड्यांची आकडेवारी 26,934 एवढी नोंदवली गेली.