अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टर मुंडे दांपत्याला सक्त मजुरी

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यभर गाजलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात आज बीड जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणात न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडे यांना दोषी ठरवले आहे. तसेच डॉ. मुंडेची पत्नी सरस्वती मुंडे आणि पिडीतेचा पती महादेव पटेकर हे सुद्धा यात दोषी आढळून आले आहेत. न्यायालयाने सर्व दोषींना १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. तर पुराव्यांअभावी ११ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

बीड जिल्हा न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना दोषी ठरवलं आहे. डॉ. सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे, महादेव पटेकर यांना प्रत्येकी दहा वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याप्रकरणात १७ आरोपी असून त्यापैकी जळगावच्या डॉक्टर राहुल कोल्हेचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे १६ जणांचा आज निर्णय अपेक्षित होता.

या प्रकरणात मुंडे दांपत्याला न्यायालय कोणती शिक्षा सुनावणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या गुन्ह्यातील आरोपींना कोणती शिक्षा मिळणार याची शहरात सकाळपासून चर्चा होती. शिक्षा सुनावलेल्या आरोपींना कलम 312, 314, 315 आणि 6 पी सी पी एन डी टी कायद्यांनुसार दोषी धरण्यात आलं.

परळीमध्ये मे 2012 मध्ये विजयमाला पटेकर या महिलेचा अवैध गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्यावरुन डॉक्टर सुदाम मुंडे आणि त्यांची पत्नी सरस्वती मुंडे यांच्या मुंडे हॉस्पिटलमधील कारभार जगासमोर आला होता. या रुग्णालयात अवैध गर्भपात, गर्भलिंग चाचण्या होत असल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी तब्बल ७ वर्षे खटला चालल्यानंतर आज न्यायालयाने तिघांना दोषी धरत शिक्षा सुनावली.