जुन्या भांडणातून तरुणाचा तलवारीने सपासप वार करुन खून

पाथर्डी : पोलीसनामा ऑनलाईन – जुन्या भांडणाची कुरापत काढत पाच ते सहा जणांनी तलवार आणि चाकूने वार करुन तरुणाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि.१९) रात्री नऊच्या सुमारास घडली होती. याप्रकरणात इंदिरानगर पोलिसांनी 6 संशयितांना आज (बुधवारी) दुपारी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

रितेश पाईकराव (वय-१९) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरेगाव रस्त्यावरील सुखदेव नगर येथे काल रात्री नऊच्या सुमारास रितेशचा खून झाला होता. जुन्या भांडणातून रितेशचा खून करण्यात आला होता. यानंतर त्याच्या वडिलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून उमेश आव्हाड, नाना दोंदे, नयन शिंदे आणि तीन अल्पवयीन संशयितांना पाथर्डी परिसरातून ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक रोहित शिंदे हे तपास करीत आहेत.

मयत रितेश हा काल रात्री नऊच्या सुमारास बाहेर जाऊन येतो असे सांगून गेला होता. परंतु बराच वेळ तो घरी न आल्याने वडील व मेहुणे त्याला बघण्यासाठी गेले. घरापासून थोड्याच अंतरावर तो गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.