सुप्रसिद्ध व्यापाऱ्याचा धारदार शस्त्राने वार करुन खून

हातकणंगले : पोलीसनामा ऑनलाईन – इचलकरंजीतील सुप्रसिद्ध व्यापाऱ्याचा हातकणंगले हद्दीमध्ये धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अशोक सत्यानारायण छापरवाल (वय-३८ रा. महेशनगर, इचलकरंजी) असे या व्यापाऱ्याचे नाव असून ते कालपासून बेपत्ता होते. ही घटना हातकणंगले हद्दीतील तारदाळ माळावर रेल्वे रुळानजीक उघडकीस आली.

अशोक छापरवाल यांच्या मानेवर व अंगावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना उघडकीस आली. हा खून आर्थिक वादातून झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

इचलकरंजीतील महेश कॉलनी परिसरात छापरवाल कुटुंबीय राहतात. छापरवाल कुटुंबीय हे कापड विक्री क्षेत्रातील बडे प्रस्थ आहे. छापरवाल कुटुंबाचा अत्याधुनिक यंत्रमागचा मोठा कारखाना आहे. गुरुवारी दुपारपासून छापरवाल कुटुंबीयांचा अशोक यांच्याशी संपर्क होत नव्हता. शेवटी रात्री उशिरा छापरवाल कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अशोक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. शुक्रवारी सकाळी तारदाळ भागात अशोक छापरवाल यांचा मृतदेह सापडला. तीक्ष्ण हत्यारांनी वार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. यापुढील तपास पोलिस करत आहेत.

व्यापाऱ्यांचा ४८ तास व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय
इचलकरंजीतील उद्योजकाचा हातकणंगले हद्दीमध्ये धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी उघडकीस आली. या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी ४८ तास आपला व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, येत्या ३६ तासांत तपास पूर्ण करून संशयितांना अटक केली जाईल. त्यासाठी विविध सहा ठिकाणी पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली.