पुर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दीड वर्षापुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार पेठेत गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली.

साहिल अशोक रजपुत (२१, मंगळवार पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांने दिलेल्या फिर्यादीनुसार फरासखाना पोलिस ठाण्यात सुरज ठोंबरे, गोट्या माने, शुभम पवळे, ओमकार कुडले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेला तरुण व हल्लेखोरांमध्ये दिड वर्षापुर्वी भांडण झाले होते. त्यानंतर रजपुत याने त्यांच्याविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्यात धुसफुस सुरु होती. त्यानंतर गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मित्र लक्ष्मण मोरे याच्यासह दुचाकीवरून जात होता. त्यावेळी नळ स्टॉप येथून नाश्ता करून तो शाहिर अमर शेख चौकाकडून शिवाजीनगर कोर्टाकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना सनी बेलखडेच्या चहाच्या टपरीसमोर आल्यावर समोरून ट्रक आला. त्यामुळे त्याने दुचाकी बाजूला दाबली. त्यानंतर पाठीमागून आलेल्या चौघांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. यात त्याच्या डोक्याला, व तोंडावर गंभीर मार लागला असून उपचार सुरु आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हर्षल लोहकरे करत आहेत.