किरकोळ कारणावरून भावकीतील दोघांवर खूनी हल्ला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन –मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ गावात किरकोळ कारणावरुन बेकायदेशीर जमाव जमवून भावकीतील दोघांवर टिकाव आणि फावड्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. 14) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

या प्रकरणी प्रवीण त्रिंबक घारे (30, रा. बेबडओव्हळ, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर रवी घारे, बंटी घारे, कालीचरण घारे, शंकर घारे, संतोष घारे (सर्व रा. बेबडओव्हळ, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि राजकुमार पिंगळे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी आरोपींनी फिर्यादी प्रवीण यांच्या घरासमोर बेकायदेशीर जमाव जमवला. राजकुमार पिंगळे यांच्या डोक्यात रवी घारे याने फावडे मारले. तर बंटी घारे याने टिकावाने मारले. यामध्ये राजकुमार गंभीर जखमी झाले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी प्रवीण गेले असता त्यांनाही जीवे मारण्याच्या उद्देशाने फावड्याने मारहाण केली. ते देखील गंभीर जखमी झाले. सर्व आरोपींनी शिवीगाळ करत लथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.