भरधाव जीपच्या धडकेत 2 शिक्षक जागीच ठार तर क्‍लर्क गंभीर जखमी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव जीपने धडक दिल्याने 2 शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेला क्‍लर्क गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी सावनेर-छिंदवाडा रस्त्यावर घडली. याबाबत जीप चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्युमुखी पडलेले शिक्षक हे मॉर्निंग वॉकसाठी गेलेले होते.
नागोराव गुंडेराव बनसिंगे (40, रा. कोच्छी, सावनेर) आणि हेमंत भाऊराव लांडे (45, रा. मेंडला, सावनेर) अशी मृत्यु झालेल्या शिक्षकांची नावे आहेत तर त्यांच्यासोबत असलेले दुर्गेश गोविंद चौधरी (रा. बडेगाव, सावनेर) हे गंभीर जखमी झाले आहेत. बनसिंगे आणि लांडे हे दोघे सिरोंजी येथील महात्मा गांधी विद्यालयात कार्यरत होते. चौधरी देखील त्याच विद्यालयात क्‍लर्क म्हणून काम करतात. तिघेही नेहमीप्रमाणे आज (बुधवारी) सकाळी सावनेर-छिंदवाडा रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. वॉक चालु असतानाच पाठीमागुन आलेल्या भरधाव जीपने त्यांना धडक दिली. जीप भरधाव असल्याने आणि चालकाला जीप नियंत्रण करता न आल्यामुळे बनसिंगे आणि लांडे यांचा जागीच मृत्यू झाला तर क्‍लर्क चौधरी हे गंभीर जखमी झाले. परिसरात मॉर्निेंग वॉक करीत असलेल्या इतर जणांनी त्यांना तात्काळ सावनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. रूग्णालयातील डॉक्टरांनी बनसिंगे आणि लांडे यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या चौधरींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रूग्णालयात रवाना करण्यात आले. घडलेल्या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जीप चालकाविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.